Ind Vs Aus Test Series : भारताचा ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय, मालिका 1-1 ने बरोबरीत

एमपीसी न्यूज – भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 70 धावांचे आव्हान भारतानं दोन गडी गमावून पार केलं. कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटची विजयी धाव काढली. या विजयामुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफी 1-1 अशी बरोबरीत आली आहे.

सत्तर धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल अवघ्या पाच धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजाराही 3 धावा काढून कमिन्सच्या गोलंदजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही सुरेख फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केलं. शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणलं. अखेरीस रहाणे-गिल जोडीने संघाला विजय मिळवून दिला. गिलने 35 तर रहाणेने 27 धावा केल्या.

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाची 6 बाद 133 पासून पुढे खेळी सुरू झाली. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या सत्रात चांगलंच झुंजवलं. कमिन्सला बुमराहने 45 धावांवर बाद केलं. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील 57 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत झुंजवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला.

अखेरीस आश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवत कांगारुंचा दुसरा डाव 200 धावांवर संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने 3, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 तर उमेश यादवने 1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.