-MPC-TOP-MOST-BANNER-I

IND V/S SL 1st ODI : बा अर्जुना, दुय्यम संघानेही केले तुझे लंकादहन!

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – श्रीलंका संघाचा महान कर्णधार आणि राजकीय नेता अर्जुना रणतुंगा याने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला खरा, पण ज्या संघाला त्याने दुय्यम संघ म्हणून हिणवले, त्याच भारतीय युवा संघाने काही दिवसातच अर्जुनाचे दात त्याच्याच घशात घालत पहिल्या सामन्यात तरी बाजी मारली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

बोलण्यापेक्षा करून दाखवणे ज्याची तहहयात ख्याती आहे, त्या भारतीय संघाचा आणि जागतिक क्रिकेटचा  असली राजदूत म्हणून ओळखला जाणाऱ्या राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आणि शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाचे लंकेत स्वागत करताना श्रीलंकेचा सर्वात यशस्वी कर्णधार अर्जुना रणतुंगा याने भारताचा हा संघ दुय्यम असल्याचे म्हणत सामने रंगतदार होतील का अशी शंका व्यक्त केली होती. मात्र आजन्म वेगवान मारा खेळताना कितीही भीषण बाऊन्सर लीलया सोडून देणाऱ्या राहुल द्रविडने अर्जुनाच्या या टीकेला दुर्लक्षित करून आपल्या युवा संघाला नेमके काय करायचे याचेच मार्गदर्शन केले आणि त्याचाच प्रत्यय आजच्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात क्रिकेट रसिकांना आला.

कसल्याही दडपणाखाली न खेळता शिखर धवनच्या संघाने पहिल्या सामन्यात लंकादहन करत तब्बल सात गडी राखून आणि जवळपास पंधरा षटके राखून दणदणीत विजय मिळवताना आपला खरा दर्जा दाखवून दिला.

कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दासून शनाका याने नाणेफेक जिंकली आणि क्षणात प्रथम फलंदाजी करत राहोय, असे सांगितले. आविष्का फर्नांडो आणि भानुका यांनी 9 षटकात 49 धावांची बऱ्यापैकी सलामी देत चांगली सुरवात करून दिली खरी, मात्र एकही फलंदाज मोठी खेळी करू न शकल्याने त्यांची धावसंख्या निर्धारित पन्नास षटकात केवळ 262 धावाच जमवू शकले, यात एकही शतक झाले नाही की अर्धशतकही!

करुणारत्नेने केलेल्या 35 चेंडूतील नाबाद 43 धावा आणि कर्णधार शनाकाच्या 38 धावा यामुळेच श्रीलंका संघाने कसेबसे 262 धावांचे आव्हान भारतीय संघाला दिले.

भारताकडून खूप मोठ्या अंतरानंतर खेळणाऱ्या कुलदीप यादव आणि यजुर्वेद चहल यांनी या मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या 19 षटकात 90 धावा देताना चार गडी बाद करत आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले, त्यांना दीपक चाहर आणि कृणाल पंड्याने उत्तम साथ दिली. दुखापतीमुळे दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय सामन्यापासून दूर असणाऱ्या भुवनेश्वर कुमारने मात्र 7 च्या सरासरीने धावा देत बळीचे खाते कोरेच ठेवले आणि पहिल्या सामन्यात निराशाजनक प्रदर्शन केले, मात्र त्याचे फीट असणे महत्त्वाचे असल्याने आणि तो उत्तम गोलंदाज असल्याने त्याचे चाहते या कामगिरीवर सुद्धा खूश असतील यात काही शंका नाही.

उत्तरादाखल खेळताना गब्बर धवन आणि पृथ्वी शॉने जबाबदारी आणि आक्रमण याचे अचूक मिश्रण करत भारतीय संघाला जोरदार सुरुवात करून दिली. अवघ्या 33 चेंडूत 58 धावांची वेगवान भागीदारी करून देताना पृथ्वी शॉ हा फार आक्रमक खेळत होता, त्याने केवळ 24 चेंडूत 43 धावा ठोकत आपल्या आयपीएलमधल्या फॉर्मचीच री कायम असल्याचे दाखवले खरे पण हाच अतीआक्रमकपणा त्याला नेहमीप्रमाणे घातक ठरला आणि तो जम बसल्यावरसुद्धा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यातच बाद होण्याच्या एकच चेंडू अखेर त्याच्या हेल्मेटवर एक बाऊन्सरही आदळला. त्यामुळे काही इजा वगैरे झाली असल्याची आशंका आली होती, पण नंतर सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना त्याने दुखापतीबद्दलची माहीती दिली.

त्यानंतर आलेल्या नवोदित ईशान किशनने पहिल्याच आंतरराष्ट्रीय चेंडूवर गगनचुंबी षटकार मारत भारतीय क्रिकेट संघाच्या भवितव्य किती उज्ज्वल आहे, याचीच चुणूक दाखवली आणि हाच धडाका कायम ठेवत आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक करून 20/20 आणि एकदिवसीय सामन्यात अर्धशतक नोंदवणारा पहिला भारतीय असा नावलौकिक मिळवला, त्याने जबरदस्त फलंदाजी करताना कर्णधारासोबत मोठी भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. 42 चेंडूत 59 धावा करून तो बाद झाला.

त्यानंतर आलेल्या सूर्यप्रकाश यादवने नावाप्रमाणेच तळपत कर्णधार धवन सोबत नाबाद राहत संघाला सात गडी आणि जवळपास पंधरा षटके राखून मोठा विजय मिळवून दिला. शिखर धवनने कारकिर्दीतले 33 वे अर्धशतक नोंदवलेच त्याचसोबत सलामीला येऊन शेवटपर्यंत नाबाद राहण्याची कामगिरी सुद्धा नोंदवून आपल्या कर्णधारपदाच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला. त्याने नाबाद 86 धावा केल्या आणि अर्जुनाच्या वाक्बाणाने व्यथित न होता त्याच्या टीकेला जोरदार विजय मिळवून दाखवत आपला दर्जा दाखवून दिला, असे म्हटले तर त्यात वावगे काय?

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.