IND vs AUS : भारतीय फिरकीच्या जाळ्यात झाली कांगारूची शिकार

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – कालच्या अखेरच्या सेशनमध्ये सकारात्मक आणि आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर प्रतिचढाई करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय मैदानावर नवा दिवस नवी खेळपट्टी चा जबरदस्त प्रत्यय दाखवत जडेजा अश्विन जोडीने केवळ 52 (आजच्या)धावांत गुंडाळून टाकले आणि या महान फिरकी जोडीच्या जादूपुढे जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा डाव आज अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. (IND vs AUS) त्यानंतरच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या 114 धावा भारतीय संघाने चहापानाच्या आधीच चार गडी गमावत पुर्ण केल्या आणि चार कसोटीच्या मालिकेतला दुसरा सामनाही अडीच दिवस राखून जिंकत बोर्डर गावसकर मालिकाही आपल्याकडेच पुन्हा एकदा ठेवली.

अजुन मालिकेतले दोन सामने बाकी असून त्यातला एक जरी भारतीय संघाने जिंकला तर मालिका भारतीय संघ जिंकेल,मात्र चमत्कार करत ऑस्ट्रेलियन संघाने पुढील दोन्हीही सामने जिंकलेच तरीही ही मालिका भारतीय संघाकडेच राहणार हे नक्की.

काल जबरदस्त खेळ करत ऑस्ट्रेलियन संघाने आपले आव्हान जिवंत ठेवलेय असे वाटत होते. मात्र असली कसोटी क्रिकेट म्हणजे काय याचा सुंदर आणि रोमहर्षक प्रत्यय आज तमाम क्रिकेटरसीकांना पुन्हा एकदा अनुभवता आला.आज सकाळी खेळ सुरु झाल्यानंतर आक्रमक खेळत असलेल्या हेडला अश्विनने पहिल्याच षटकात बाद करुन जोरदार धक्का दिला तर त्यानंतर आलेल्या स्मिथला केवळ वैयक्तिक 9 धावांवर पायचीत करुन पुढे काय होणार आहे याचाच जणू संकेत दिला.तरीही ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या तीन बाद 85 अशी होती. पण यानंतर रवींद्र जडेजाने जबरदस्त गोलंदाजी करत आपल्या फिरकीच्या तालावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरशः गूढघ्यावर बसवले आणि केवळ 28 धावा आणखी जमवत ऑस्ट्रेलियन संघ 3 बाद 85 वरून  सर्वबाद 113 अशा वाईट अवस्थेत कोलमडून गेला.

लाबूशेन, कॅरी,कमिन्स आणि ऐनवेळी नशिबाने दुसऱ्या डावात वॉर्नर ऐवजी संघात आलेला रेनशॉ एकालाही जडेजाची फिरकी उमजलीच नाही आणि शब्दशः पत्त्याच्या बंगल्यासारखा ऑस्ट्रेलियन डाव कोसळला.जडेजाने आपल्या करियरमधली सर्वोत्तम गोलंदाजी करत दुसऱ्या डावात (IND vs AUS) 42 धावा देत 7 तर सामन्यात एकूण दहा बळी मिळवून सामना जिंकून देणारी सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. त्याला रवीचंद्रन अश्विननेही 3 बळी घेत उत्तम साथ दिली. या दोघांनीच ऑस्ट्रेलियन डाव गुंडाळून भारतीय संघासाठी विजयाचे कवाडे उघडे केले.

मालिकेतल्या सलग दुसऱ्या विजयासाठी 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचीही सुरुवात खराबच झाली.आपल्या फॉर्म साठी झुंजत असलेल्या के एल राहुलला आजही सुर गवसला नाहीच.तो डावाच्या दुसऱ्याच षटकात फक्त एक धाव करून लायनची शिकार ठरला.त्यानंतर आपली 100 वी कसोटी खेळणारा पुजारा खेळायला आला.पहिल्या डावात तो भोपळा ही फोडू शकला नव्हता,त्यामुळे त्याच्यावरही दडपण होते. हे ओळखून कर्णधार रोहितने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक आणि आकर्षक शैलीत फटकेबाजी करायला सुरुवात केली.त्याने काही देखणे फटके मारत सामना लवकरच जिंकणार अशी आशा दाखवणारी फलंदाजी सुरू केली. पुर्ण भरात असलेल्या रोहितची फलंदाजी बघण्यासारखा दुसरा आनंद काही नसाचा अशी त्याची खेळी बघताना जाणवते.

आजही तसेच काही तरी होणार असे वाटत असताना पूजाराने त्याच्या हाकेला साद न दिल्याने तो दुर्दैवी पध्दतीने धावबाद झाला.यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने केलेला जल्लोष बघता आणि एकंदरीतच खेळपट्टीवर असलेल्या फिरकीच्या हुकूमतीने काळजाचा ठोका नाही म्हटले तरी नक्कीच चुकला. पण झालेल्या चुकीला विसरत पुजाराने आपल्या लौकिकास जागणारी फलंदाजी करत डाव सावरला. (IND vs AUS) त्याला कोहलीनेही चांगली साथ द्यायला सुरूवात केली.या दरम्यान कोहलीने आंतरराष्ट्रीय सामन्यात 25000 धावांचा टप्पा पार करुन आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला.ही जोडीच संघाला विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच कोहली वैयक्तिक 20 धावांवर असताना मर्फीला पुढे येवून मारण्याची चूक करून बसला आणि डोळ्याचो पापणी लवायच्या आतच कॅरीने त्याला यष्टीचीत करुन भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का दिला.

या आपल्या जेष्ठ खेळाडूच्या चुकीतून श्रेयस अय्यरने कसलाही धडा घेतला नाही आणि अतिआक्रमक अंदाजात खेळण्याच्या नादात तो हकनाक खराब फटका मारून लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला. द्रविड गुरू आता त्याचे कान उपटतील की श्रेयस या चुकीतुन धडा घेईल का हे बघणे रंजक ठरेल,मात्र तो बाद झाला तेंव्हा भारतीय संघाची धावसंख्या चार बाद 88 अशी झाली होती. तरिही भारतीय संघाने घाबरावे अशी कोणतीही परिस्थिती नव्हती,कारण ऑस्ट्रेलियन संघाकडे ना जडेजा होता ना त्यासम दुसरा घातक फिरकी गोलंदाज. यावेळी भारतीय संघ व्यवस्थापनाने जडेजा च्या आधी भरतला पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्याने त्या निर्णयाला सार्थ ठरवत केवळ केवळ 22 चेंडूत 3 चौकार आणि एक उत्तुंग षटकार मारत आक्रमक 23 नाबाद धावा करुन संघाला विजयासमीप आणून ठेवले.

आता  विजयाची फक्त औपचारिकताच बाकी होती.ती पुजाराने एक खणखणीत चौकार मारत पूर्ण केली आणि भारतीय संघाने नागपूर पाठोपाठ दिल्ली कसोटीवरही वर्चस्व गाजवत मालिका आपल्याकडेच ठेवुन मोठी कामगिरी केली.या विजयाने भारतीय संघाचा विश्वकप कसोटी सामन्याच्या अंतिम सामन्यातला प्रवेश जवळजवळ नक्की झालाय,पण या कमजोर ऑस्ट्रेलियन संघावर दणदणीत मात करून (IND vs AUS) ही मालिकाही मोठया फरकाने जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघ नक्कीच करणार ही आशा नव्हे तर खात्रीच भारतीय  समर्थक बाळगून आहेत, आणि त्यांनी ती का बाळगू नये? कारण ही भारतीय संघासाठी खरोखरच सुवर्णसंधी आहे,ती त्यांनी साधावी इतकेच यावेळी म्हणावे वाटते. आपल्या जादुई फिरकीने सामन्याला कलाटणी देणारा जडेजाच सलग दुसऱ्या वेळी सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया

पहिला डाव सर्वबाद 263 आणि दुसरा डाव सर्वबाद 113

हेड 43,लाबूशेन  35

जडेजा 42/7 अश्विन  59/3

पराभूत विरुद्ध भारत

पहिला डाव सर्वबाद 262

दुसरा डाव 4 बाद 118

रोहित 31,कोहली 20,पुजारा नाबाद 31भरत नाबाद 23

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.