India vs Australia Test Match : प्रस्थापित धडपडले पण तळाचे लढले

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) -आघाडीचे फलंदाज अपयशी ( India vs Australia Test Match ) ठरल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी केलेल्या झुंजार खेळामुळेच भारतीय संघ मोठ्या धावांच्या पिछाडीवर गेला नाही,तरीही पहिल्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या कसोटीत मात्र शानदार खेळ करत भारतीय संघाला अडचणीत आणले आहे.
एक धावाची नाममात्र आघाडी घेत दुसऱ्या डावात मात्र जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या कसोटीच्या  दुसऱ्या डावात आक्रमक आणि तितक्याच सकारात्मक पध्दतीने खेळत आजच्या दुसऱ्या दिवसाच्या  उरलेल्या बारा षटकात पाचहुन अधिक सरासरीने धावा ठोकत आपली आघाडी मजबूत करण्याकडे एक दमदार पाऊल टाकत ही कसोटी आम्ही सहजासहजी सोडणार नाही असाच संदेश दिला आहे.
आजच्या दिवसाचा खेळ समाप्त झाला तेंव्हा ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाचा बळी गमावत 61 वेगवान  धावा करत सकारात्मक खेळीचे सुंदर प्रात्यक्षिक दाखवले आहे.
त्याआधी कालच्या नाबाद भारतीय जोडीने आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात करताना आणखीन 27 धावा जोडत संघाला बऱ्यापैकी ठोस सुरुवात करून दिली होती.
रोहित आणि राहुल चांगले खेळत आहेत असे वाटत असतानाच ऑस्ट्रेलियन अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लायनने के एल राहुलला वैयक्तिक 17 धावांवर असताना पायचीत करून पुन्हा एकदा निराश केले.शुभमन गीलचा उत्तम फॉर्म दुर्लक्षित करून राहुलला संघात घेणाऱ्या संघ व्यवस्थापनाला आता या निर्णयाचा पश्चातापच व्हावा असा अपयशी खेळ राहुल वारंवार करतो आहे, हे चित्र आजही बदलले नाही.
त्यानंतर आलेल्या आणि आपल्या 100व्या कसोटीत खेळणाऱ्या पुजारालाही आज काही खास करता आले नाही, आपले खाते उघडण्याआधी दोनवेळा डी आर एसच्या सौजन्याने वाचलेल्या पुजाराला लायननेच पायचीत करुन तंबूत परत पाठवले आणि भारतीय संघासह त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठाच धक्का बसला.पाठोपाठ थोड्याच  वेळात जम बसलेला कर्णधार रोहित, पुनरागमन करणारा श्रेयस अय्यरही स्वस्तात बाद झाले आणि भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला.यावेळी भारतीय संघ  4 बाद 66 अशा बिकट अवस्थेत सापडला होता.
या कठीण प्रसंगी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीने आपला सर्व अनुभव पणाला लावत धीरोदात्त खेळ करत पाचव्या गड्यासाठी 59 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संकटातून बाहेर काढण्यात  मोठेच यश मिळवत उत्तम कामगिरी केली.ही जोडी टिकतेय असे वाटत असतानाच आधी जडेजा मर्फीच्या फिरकला चकला अन नंतर पंचाच्या खराब निर्णयामुळे जम बसलेल्या विराट कोहलीलाही तंबूत निराश होवून परतावे लागले.
या कसोटीत मागील दोनही दिवसात पंचाची कामगीरी सदोष होतेय हे डी आर एस मूळे स्पष्टपणे दिसत आहे.44 धावांची संयमी खेळी करणाऱ्या विराटची मोठी खेळी या खराब निर्णयामुळे नक्कीच हुकली, मात्र क्रिकेटमध्ये असे बऱ्याचदा होते हे रसिकांना माहिती आहेच.यावेळी भारतीय संघ पुरता संकटात सापडला होता मात्र अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन या जोडीने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत जबरदस्त झुंजारवृत्तीने खेळ करत 114 धावांची मोठी भागीदारी करुन संघाला संकटातून बाहेर काढले.भारतीय संघातील एकापेक्षा एक असे महारथी म्हणवणारे फलंदाज दिल्लीच्या जेटली मैदानावर हाराकीरी करत धारातीर्थी पडत होते.
यावेळी मायदेशात अतिशय बलाढ्य असणाऱ्या फलंदाजीला भगदाड पडत असताना तळाच्या या दोन मुलत: गोलंदाज असलेल्या या फलंदाजांनी जबरदस्त विजिगिशु वृत्तीचे प्रदर्शन करत संघाचे वस्त्रहरण टाळले.अक्षर पटेल,रवीचंद्रन अश्विनने आघाडीच्या फलंदाजांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी फलंदाजी करत संघाची ना फक्त लाजच राखली, पण एकवेळा पाहुणा संघ भारतीय संघावर मोठी आघाडी घेईल असे वाटत असतानाच ते होणे नाही असे दाखवत बाजी पलटवत भारतीय संघालाच आघाडी मिळेल अशी सुस्थिती निर्माण केली होती, मात्र शेवटी शेवटी ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजांनी आपल्या संघाला एका धावाची का होईना पण नाममात्र आघाडी मिळवून देत भारतीय फलंदाजी तितकीही बलाढ्य नाही असाच आपल्या संघाला संदेश देत आत्मविश्वासही वाढवला.

त्याचवेळी अक्षर पटेल,रवीचंद्रन अश्विन यांनीही झुंजार खेळ करत खेळपट्टीचा उगाचच बाऊ करू नये असेच जणू आघाडीच्या रथी महारथीना सुचवले.त्यांनी केलेल्या 114 धावांच्या मोठ्या भागीदारीमुळेच भारतीय संघ आपली नामुष्की टाळण्यात यशस्वी झाला.दुर्दैवाने पुन्हा एकदा अक्षर पटेल शतकाकडे ( India vs Australia Test Match ) वाटचाल करत असतानाच ती जादूई तीन अंकी वैयक्तिक धावसंख्या गाठू शकला नसला तरी त्याने केलेल्या खेळीच मोल शतकी खेळीइतकेच नक्की असेल.
म्हणूनच तो बाद झाल्यानंतर तंबूत परतत असताना मैदानावरील तमाम प्रेक्षकांनी आणि संघातील त्याच्या सहकाऱ्यांनी टाळ्यांची मानवंदना देत त्याच्या या अविस्मरणीय खेळीचे कौतुक केले.वैयक्तिक 74 धावा करून अक्षर बाद झाल्यानंतर भारतीय संघ आघाडी घेईल ही आशाही माळवली आणि तसेच घडले. अर्थात ऑस्ट्रेलियन संघालाही फक्त एकाच धावेची नाममात्र आघाडी मिळाली. आणि ही आघाडी मिळवून देण्यात यशस्वी ठरला तो अनुभवी नाथन लायन.त्याने 67 धावा देत पाच गडी बाद केले तर त्याला टॉड मर्फी आणि पदार्पण करणाऱ्या कुनेमनने दोन दोन गडी बाद करत उत्तम साथ दिली. तर कर्णधार पॅट कमिन्सने एक गडी बाद केला.
नाममात्र आघाडी घेतल्याने मनोबल वाढलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाला जरी लवकर गमावले असले तरी त्यांच्या आत्मविश्वासात फारसा फरक पडला नाही.या मालिकेत प्रथमच सलामीला आलेल्या हेडने वॉर्नरच्या जायबंदी होण्यामुळे मिळालेल्या संधीचे आतापर्यंत तरी सोने करत केवळ 40 चेंडूत 5 चौकार आणि  एक षटकार मारत नाबाद 39 धावा करताना अश्विनसह जडेजाच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.
त्याला मार्नस लाबूशेननेही चांगली साथ देत नाबाद 16 धावा करत भारतीय गोलंदाजीला  आज तरी बोथट केले.या जोडीने 38 धावांची नाबाद भागीदारी करत संघाची आघाडी 62 वर नेवून ठेवत ( India vs Australia Test Match )  ऑस्ट्रेलियन संघात नवचैतन्य आणले आहे. उद्या सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना जोरदार मारा करावा लागेल अन्यथा ऑस्ट्रेलियन संघ आपल्या आघाडीला मजबूत करण्यात यशस्वी ठरू शकतो, अन जर का असे झाले तर …..
तर या कसोटीत भारतीय संघाला दडपणाखाली येण्याची नामुष्की येवू शकते. अर्थात ही फक्त शक्यता आहे.भारतीय गोलंदाज उद्या नव्या दमाने गोलंदाजी करुन पाहुण्या संघाला स्वस्तात गुंडाळून ही कसोटीही आपल्या नावावर करतील का याचे उत्तर उद्याच मिळेल.
संक्षिप्त धावफलक
 भारत 
पहिला डाव सर्वबाद 262
अक्षर पटेल 74,रोहित 32,कोहली 44,अश्विन 37 जडेजा 26
लायन 67/5,मर्फी 53/2
विरुद्ध 
ऑस्ट्रेलिया
पहिला डाव 263 आणि दुसरा डाव एक बाद 61
हेड नाबाद 39,लाबूशेन नाबाद 16
जडेजा 23/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.