INDvSA-Odi : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 8 गड्यांनी विजय; अर्शदीप सिंघ, आवेश खानचा भेदक मारा

एमपीसी न्यूज – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA-Odi)यांच्यात जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने आफ्रिकेचा 8 गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन फलंदाजांचा अर्शदीप सिंघ आणि आवेश खान या भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे निभाव लागला नाही.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंघ आणि आवेश खान यांनी चुकीचा ठरवला. 2 बाद 3 धावा अशा नाजूक स्थितीत खेळणाऱ्या आफ्रिकेला भारतीय युवा गोलंदाजांनी सावरण्याची एकही संधी दिली नाही.

Pune : मानवता, बंधुभावाचा विचार समाजाला सक्षम बनवेल : योगेंद्रसिंग यादव

आफ्रिकेची स्थिती 11 व्या षटकात 6 बाद 52 धावा (INDvSA-Odi)अशी झाली. यापुढे फेल्ह्यूक्वायो याने 33 धावांची खेळी करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धावफलकावर शतक लावण्यासाठी आफ्रिकेच्या फलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. मात्र आफ्रिकेचा डाव 116 धावांवर गडगडला.

या सामन्यात भारताचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंघ याने बळींचा पंजा उघडला. त्याने महत्वपूर्ण 5 गाडी बाद केले. तर दुसऱ्या बाजूने आवेश खान याने 4 गाडी बाद करत आफ्रिकन फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. कुलदीप यादवने एक गडी बाद केला.

 

आफ्रिकेने दिलेल्या 116 धावांचा पाठलाग करतांना भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याला जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. तो 5 धावा करून माघारी परतला.

 

त्यानंतर आलेला श्रेयश अय्यर आणि या सामन्यातून अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा युवा फलंदाज साई सुदर्शन यांनी भारताला विजयासमीप नेले. साई सुदर्शनने पहिल्याच सामन्यात अर्धशतक लगावत 55 धावांचे योगदान दिले. तर दुसऱ्या बाजूने श्रेयश अय्यर 52 धावा करून बाद झाला. आफ्रिकेने दिलेले 116 धावांचे लक्ष्य भारताने 16.4 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज गाठले.

या विजयासह भारताने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचातला पुढील सामना 19 डिसेंबर रोजी केबरहा येथे खेळला जाणार आहे.

या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचे 5 गडी बाद करणारा अर्शदीप सिंघ सामनावीर ठरला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.