Chikhali News : कोरोनायुद्धात इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूल मध्ये संपूर्ण स्वास्थ्य शिबीर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देशातील सर्व शाळा महाविद्यालये पुन्हा एकदा सुरळीतपणे टप्प्या – टप्प्याने सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर चिखली-मोशी येथील इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण स्वास्थ्य शिबीर घेण्यात आले.

उपनिषदांमध्ये सांगितलेल्या वचनाप्रमाणे कानासाठी शब्द आहार आहे, त्वचेसाठी स्पर्श आहार आहे, डोळ्यांसाठी दृश्य आहार आहे, नाकासाठी गंध आहार आहे, जीभेसाठी अन्न व रस आहार आहे आणि मनासाठी उत्तम विचार हा आहार आहे. ज्ञानेन्द्रियांमध्ये दोष असेल तर चेतनेमध्ये विकार होतो आणि स्वास्थ्य उत्तम नसेल तर बौद्धिक विकास खुंटतो. यासाठी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक रक्षण करणे आणि त्यास निरोगी ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे असे मत संचालिका कमला बिष्ट यांनी या शिबीरात व्यक्त केले.

आरोग्य तंदुरुस्त असणे हे आपल्याच हातात आहे त्यासाठी नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार याचबरोबर वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घेणे देखील आवश्यक असते. काही वेळा मुलांचे विकार आपल्याला दिसून येत नाहीत तर काही वेळा विकाराच्या अज्ञानामुळे मुले पालकांना सांगत नाहीत असे इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूलच्या डॉक्टरांनी पालकांना सांगितले.

इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या संपूर्ण स्वास्थ्य तपासणीत वैद्यकीय तज्ञांकडून सामान्य निरीक्षण, मानव वंश शास्त्र, चित्र व दूरदृष्टी चाचणी, श्रवण चाचणी, डोके ते पायापर्यंतची पूर्ण तपासणी, दंत तपासणी, प्रकाश झोत तपासणी, पद्धतशीर तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच कोरोना काळात घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाय देखील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

दरम्यान, इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचे पालन करून संपूर्ण स्वास्थ्य शिबीरात सहभाग नोंदवला. सर्व तंदुरुस्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.