Interview with Anil Pharande: मुद्रांक शुल्कातील सवलत ही घर खरेदीसाठी चांगली संधी -अनिल फरांदे

एमपीसी न्यूज – कमी झालेले मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) ही घर खरेदीसाठी चांगली संधी आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी आर्थिक बचत होणार आहे, असा सल्ला बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई, पुणे’चे उपाध्यक्ष अनिल फरांदे यांनी दिला. कमी झालेली स्टॅम्प ड्युटी आणि वाढलेले ‘रेडी रेकनर’चे दर याबाबत मत प्रदर्शन करणारी अनिल फरांदे यांची ‘एमपीसी न्यूज’च्या वतीने मुलाखत घेण्यात आली. त्यांच्याशी साधलेला प्रश्न-उत्तर स्वरूपातील हा संवाद.

प्रश्न : कोरोना व लाॅकडाऊनचा रियल इस्टेट क्षेत्रावर काय परिणाम झाला व या क्षेत्राला किती ‌प्रमाणात याचा फटका बसला आहे ? 

उत्तर – रियल इस्टेट क्षेत्रावर कोरोना व लाॅकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे. प्रत्यक्ष बघितलं तर हा फटका सहा महिन्यांचा आहे, मात्र अप्रत्यक्षरित्या दीड वर्षांचा फटका बसला आहे. यापुढे काय परिस्थिती असेल, हे सांगता येत नाही. लॉकडाऊन काळात गावी परतलेला कामगार वर्गही परत येत असून कामं सुरू आहेत, पण लोकांचा हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

प्रश्न : ‘पोस्ट कोरोना’ किंवा येणाऱ्या काळात काय परिस्थिती असेल? 

उत्तर – घरांची मागणी कधीही कमी होत नसते, मात्र सध्या ती स्टॅगनेट म्हणजे थांबली आहे. घर, जागा हे लोकांना हवंच असतं. त्यामुळे येणाऱ्या काळात ती मागणी वाढेल. लोकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाल्यामुळे देखील फार मोठा फरक पडला आहे. लोकांनी आपले नियोजन पुढे ढकलले आहे. त्यामुळे हळूहळू सर्व सुरळीत होईल.

प्रश्न : सरकारने मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्यूटी) कपात केली त्याचा कितपत आणि कसा फायदा होईल? 

उत्तर – मुद्रांक शुल्कात झालेल्या कपातीमुळे निश्चित फायदा होईल. त्यामुळे फ्लॅटच्या किंमती नुसार खरेदीवर 2 ते 3 लाख रुपये वाचू शकतात. घर खरेदीसाठी ही एक चांगली संधी आहे, असे म्हणता येईल.

प्रश्न : पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये रेडी रेकनरचे दर वाढले आहेत त्याबद्दल काय सांगाल?

उत्तर – रेडी रेकनरचे दर अजून पाच ते सहा महिने वाढणार नाहीत, असे अपेक्षित होते. पण, ते वाढले आहेत. सामान्यपणे हे दर दरवर्षी वाढतातच. यामुळे घर खरेदीवर फारसा फरक पडत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर, दरवर्षी समजा 5 ते 10 टक्के दर वाढले तर त्याप्रमाणे अडजस्ट करून सरकारी रेकनर दर बनवले जातात. त्यामुळे चालू दर आणि रेकनर दर यामध्ये फारशी तफावत येत नाही.

प्रश्न : मुंबईचे रेकनर दर कमी झालेत ते‌ कसे काय? 

उत्तर – मुंबई महापालिका हद्दीत रेडी रेकनरच्या दरापेक्षा कमी दराने व्यवहार झाले आहेत. त्यामुळे मुंबईत दर कमी झाले आहेत. थोडक्यात रेट करेक्शन झालं आहे.

प्रश्न : सध्या प्रॉपर्टी खरेदी करण्याबद्दल लोकांना काय सल्ला द्याल?

उत्तर – कमी झालेलं मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) पाहता घर खरेदीसाठी चांगली संधी आहे. त्यामुळे ब-यापैकी पैशांची बचत होणार आहे. लोकांना याचा लाभ घेता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.