IPL 2020 : शिखर धवनची शतकी खेळी व्यर्थ, पंजाबचा दिल्लीवर 5 गडी राखून विजय

एमपीसी न्यूज – शिखर धवनच्या दमदार शतकाच्या जोरावर दिल्लीच्या संघाने 164 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना निकोलस पूरनच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर पंजाबने 5 गडी आणि 6 चेंडू राखून सामना जिंकला. या विजयामुळे पंजाबच्या संघाने 8 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

दिल्लीच्या संघाने केलेल्या 164 या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल 5 धावांवर तर मयंक अग्रवाल 15 धावांवर माघारी परतला. पण ख्रिस गेलने तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर चोप देत संघाला गती मिळवून दिली.

गेल 29 धावांवर माघारी परतल्यानंतर निकोलस पूरनने फटकेबाजी करत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 28 चेंडूत 53 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने त्याला उत्तम साथ देत 32 धावांची खेळी केली. त्यानंतर जिमी निशम आणि दीपक हुडा जोडीने संघाला विजय मिळवून दिला.

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉचा बळी लवकर गमावला. एका चौकारासह 7 धावा काढून तो बाद झाला. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत दोघांनाही चांगली सुरूवात मिळाली पण त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. दोघेही वैयक्तिक 14 धावांवर माघारी परतले.

मार्कस स्टॉयनीस 9 धावांवर तर शिमरॉन हेटमायरदेखील 10 धावांवर बाद झाला. पण शिखर धवनने 12 चौकार आणि 3 षटकारांसह 61 चेंडूत नाबाद 106 धावांची खेळी केली. शिखर धवनच्या दमदार शतकाच्या जोरावर दिल्लीच्या संघाने 164 धावा केल्या.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.