TATA IPL 2022: लखनऊ नवाबी एक्सप्रेस सुसाट! दिल्ली संघावर केली सहा धावांनी रोमहर्षक मात!

के. एल. राहुलची सातत्यपूर्ण फलंदाजी आणि 77 धावांची खेळी ठरली विजयाची मानकरी

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) – ऋषभ पंतच्या दिल्ली संघाने या स्पर्धेत सुरुवात चांगली केली होती, पण ते सातत्य त्यांना  कायम ठेवता आले नाही, आजही त्यांनी चांगली झुंज दिली, पण तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही तो नाहीच. त्यांच्या संघाला विजयासाठी फक्त सहा धावा कमी पडल्या,पण याच सहा धावांच्या विजयाने लखनऊ संघाला मिळालेला आणखी एक विजय त्यांच्या पदार्पणातल्या विजयी कामगिरीत आणखी एक लखलखता हिरा कोंदला गेला आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर  टाटा आयपीएल 2022 मधल्या आजच्या 45 व्या सामन्याला लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात भिडंत झाली, ज्यात लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

डीकॉक आणि राहुलने पहिल्या गड्यासाठी 26 चेंडूत 42 धावांची खणखणीत सलामी दिली. डीकॉक नेहमीप्रमाणे कडक खेळत होता मात्र शार्दुल ठाकूरने त्याला आपल्या पहिल्या षटकात बाद करून ही जोडी फोडली. डीकॉकने 13 चेंडूत 23 धावा काढल्या,त्याच्यानंतर आलेल्या दीपक हुडाने पहिल्याच चेंडूपासून आपली बॅट परजायला सुरुवात केली.

दुसऱ्या बाजूने राहुलही फटकेबाजी करत होता, बघताबघता या जोडीने 61 चेंडूत 95 धावांची वेगवान भागीदारी करत दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्ला बोल केला. याचदरम्यान या दोघांनीही आपापले वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले.

ही जोडी पंतच्या डोकेदुखीत भर घालत असतानाच मिडास टच असलेल्या ठाकूरने दीपक हुडाचा आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत ही जोडी तोडली, मात्र तो बाद झाल्यावरही राहुलने आक्रमक फलंदाजी करत संघाला चांगली धावसंख्या गाठून देण्यात मोठा वाटा उचलला.

राहुललाही ठाकूरनेच बाद केले,राहूलने केवळ 51 चेंडूत 5 षटकार आणि चार चौकार मारत 77 धावा केल्या,तो बाद झाला आणि तसाच धडाका चालू ठेवत स्टोयनिस आणि कृणाल पंड्याने लखनऊ संघाला 195 धावांची मोठी मजल मारून दिली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. पृथ्वी शॉने आजही संघाला निराश केले आणि तो फक्त 5 धावा काढून चमीराच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर दिल्ली मोठा धक्का बसला तो डेविड वॉर्नरच्या बाद होण्याने. चांगल्या फॉर्मात असलेला वॉर्नरही आज फक्त 3 च धावा करू शकला. त्याला मोहसीन खानने बाद केले. यावेळी दिल्लीची अवस्था 3 षटकात 2 बाद 13 अशी बिकट झाली होती.

या कठीण परिस्थितीत संघाला सावरायला कर्णधार पंत आणि मिशेल मार्शने आपल्या परीने प्रयत्न केले, मात्र ही जोडी फक्त 60 धावांचीच भागीदारी करु शकले. 20 चेंडूत 3 चौकार आणि तितकेच षटकार मारून वेगवान 37 धावा काढून मार्श बाद झाला. त्याला गौथमने बाद केले.

त्यानंतर थोड्याच  वेळात ललित यादवही फक्त 3 धावा करुन बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर पंत आणि रोवमन पॉवेलने झुंज देत आणखी 34 धावा जोडल्या असताना 30 चेंडूत 44 आक्रमक धावा काढून पंत बाद झाला आणि दिल्ली संघाला मोठ्ठा धक्का बसला. दिल्ली संघाला पराभव स्पष्टपणे दिसायला लागला. यावेळी दिल्लीची अवस्था 13 व्या षटकात 5 बाद 120 अशी होती.

दिल्लीचा आणखी एक पराभव तोही दणदणीत होणार असे वाटत असतानाच अक्षर पटेल खेळायला आला आणि त्याने अविश्वसनीय पारी खेळत आकर्षक आणि आक्रमक अंदाजात लखनऊच्या गोलंदाजीवर चौफेर हल्ला सुरु केला. दुसऱ्या बाजूने त्याला पॉवेलही चांगली साथ देत होता, मात्र तो ही 35 धावा काढून मोहसीन खानच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि पाठोपाठ शार्दुल ठाकूरही.

या कठीण परिस्थितीतही न खचता अक्षर पटेलने प्रयत्नांची शिकस्त केली, पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही, पण त्याने मोठा पराभव फक्त सहा धावांच्या फरकावर आणून ठेवला. अक्षरने 24 चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारत नाबाद 42 धावा केल्या, पण तो संघाला विजयी करण्यात यशस्वी ठरला नाही

अखेर दिल्ली संघाला विजयासाठी सहा धावा कमी पडल्या आणि त्यांच्या पराभवाची शृंखला आजही खंडीत होवू शकली नाही, तर या विजयाने लखनऊ संघाचा विजयी प्रवास दिमाखात चालू राहिला.

संक्षिप्त धावफलक
लखनऊ सुपर जायंट्स 3 बाद 195
राहुल 77, हुडा 52, स्टोयनिस नाबाद 17
ठाकूर 40 /3

विजयी विरुद्ध

दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 189
मार्श 37, पंत 44, पॉवेल 35, अक्षर नाबाद 42, मिशेल मार्श 37
मोहसीन खान 16/4, बिश्नोई 28/1, गौथम 23/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.