IPL 2021 : बातमी आयपीएलची – माहीची ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुटली सुसाट!

मोठ्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स मधील बाराव्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा अनुभव नवख्या संजू सॅमसनवर सर्वार्थाने भारी ठरला आणि मोठ्या विजयासह चेन्नई एक्सप्रेसची घोडदौड जोरात सुरू झाली. नाणेफेकीचा अनुकूल कौल सोडला तर राजस्थान रॉयल्सला आज काहीही फायदेशीर ठरले नाही.

नाणेफेक जिंकून संजू सॅमसनने चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्यानंतरचे सर्व फासे चेन्नईच्या बाजूने अनुकूल पडत गेले.

मागच्या मोसमातला सर्वात आश्वासक नवोदित म्हणून ओळखला गेलेला ऋतुराज गायकवाड या मोसममधल्या आतापर्यंतच्या तिन्हीही सामन्यात विशेष चमक दाखवू शकला नाही. आजही तो लवकरच बाद झाला. पण त्याचा दुसरा जोडीदार फ्लापु द फ्लेसिसने मात्र जवळपास दोनशेच्या स्ट्राईक रेटने केवळ 17 चेंडूत 33 धावा काढल्या,पण याच आक्रमकतेच्या नादात तोही बाद झाला.

यानंतर आलेल्या मोईन अलीने सुद्धा तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्याची दिलेल्या संधीचा जोरदार लाभ घेत त्याचाच कित्ता गिरवत केवळ 20 चेंडूत 26 आक्रमक धावा करताना दोन षटकार आणि एक चौकार मारताना राजस्थान रॉयल्सच्या गोलदाजांचा आत्मविश्वास खच्ची केला. चेन्नईचा आणि आयपीएलच्या इतिहासातला यशस्वी फलंदाज म्हणून ओळखला जाणारा रैना आज विशेष काही चमक दाखवू शकला नाही आणि केवळ 18 धावा काढून तो ही बाद झाला.

पाठोपाठ महेंद्रसिंग धोनी आणि जडेजाही बाद झाले पण अंबाती रायडू आणि डॅरेन ब्राव्हो यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे चेन्नई संघाने राजस्थान रॉयल्स पुढे 189 धावांचे मोठे आव्हान ठेवले.राजस्थान रॉयल्स कडून चेतन साकरियाने चांगली गोलंदाजी करत तीन बळी घेतले तर ख्रिस मॉरिसने दोन बळी मिळवून त्याला उत्तम साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर आणि मनन व्होराने चांगली सलामी दिली,बटलर फारच आकर्षक आणि आक्रमक फलंदाजी करत होता. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने म्हणावी तशी साथ मिळाली नाही. प्रथम व्होरा तर लगेच कर्णधार संजू सॅमसन चुकीचा फटका मारून बाद झाले.

त्यानंतर आलेल्या शिवम दुबेने युवराज सिंगची आठवण करून देणारे काही देखणे फटके मारले खरे, पण त्यालाही घाई नडली. तो वैयक्तिक 17 धावांवर बाद झाला आणि लगेचच जडेजाने एका सुंदर चेंडूवर बटलरला 49 धावांवर बाद केले.

त्यानंतरच्या राजस्थानच्या रॉयल फलंदाजांनी केवळ हाजेरी लावायची म्हणून लावली आणि मोठी लाजिरवाणी हार पत्करली.

जडेजा आणि मोईन खानने जबरदस्त स्पिन गोलंदाजी करताना अनुक्रमे दोन व तीन गडी बाद करून राजस्थानच्या संघाला सामन्यातून जवळपास बाहेर काढले आणि याचसोबत रवींद्र जडेजाने एक-दोन नव्हे तर या सामन्यात तब्बल चार झेल घेत एक विक्रमच केला. यातून राजस्थान रॉयल्सचा संघ सावरलाच नाही आणि 149 धावाच करू शकला.

आजच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने उत्तम नेतृत्वाचे प्रदर्शन करत तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार का होता, याचे जणू उदाहरणच पेश केले. गोलंदाजीतील बदल घ्या वा जडेजाला क्षेत्ररक्षण करताना अचूक ठिकाणी उभे करणे घ्या यातून त्याने नेहमीप्रमाणे आपली देहबोली अतिशय शांत ठेवून संघाला विजय तर मिळवून दिलाच पण गुणतालिकेत सुद्धा दुसरे स्थान मिळवून दिले.

अर्थात ही फक्त सुरुवात असली तरीही मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर सुरुवात योग्य व्हायलाच हवी. नेमकी तीच सुरूवात चेन्नईची होत आहे, याचा आनंद धोनी समर्थक नक्कीच मानत असणार.

अष्टपैलू कामगिरी करून चेन्नईला मोठा विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा मोईन अली सामनावीर ठरला.

आजची काही खास वैशिष्ट्ये

दोन्हीही संघाकडून जवळपास तीनशेच्या पुढे धावा होऊनही सामन्यात एकही अर्धशतक नाही.

रवींद्र जडेजाने सामन्यात चार झेल व दोन बळी मिळवले. संजू सॅमसन खूप गुणवत्ता असलेला खेळाडू आहे, पण त्याच्या खेळात सातत्य नसते. या आरोपाला खतपाणी घालणारा त्याचा आजचा खेळ होता. महेंद्रसिंग धोनीने आज त्याची धूर्त कॅप्टनशीप दाखवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.