IPL 2022 GT Vs SRH : गुजरात टायटनचा विजयी रथ अपराजितच!

गुजरात संघाची विजयी घोडदौड चालूच,शेवटच्या चेंडूवर षटकार मारत मिळवला रोमहर्षक विजय

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) – शेवटच्या तीन षटकात तळातले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोडीने (ते फक्त त्या क्रमांकावर खेळतात म्हणून तसे म्हणायचे) अविश्वसनीय खेळ करत 18 चेंडूत 50 च्या आसपासचे कठीण लक्ष्य लीलया पेलत राहुल तेवतीया आणि करामती रशीद खानने गुजरात संघाला एक रोमहर्षक आणि अविस्मरणीय विजयही मिळवून दिला, जो गुजरात संघाचा सातवा विजय ठरला. पराभूत संघांतल्या उमरान मलीकला मात्र त्याच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी सामन्याचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले.

टाटा आयपीएल सुरू झाले आणि बघताबघता त्याचा आजचा 40 वा सामनाही आला, जो आपल्या पहिल्याच हंगामात सहा सामने जिंकून सर्वाना प्रभावित करणाऱ्या गुजरात टायटन विरुद्ध पहिले काही सामने हारल्यानंतर सलग पाच सामने जिंकणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद या दोन तगड्या संघात खेळवला गेला. गुजरात संघाने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत 5 गडी राखून सनसनाटी विजय मिळवून आपल्या विजयी रथाची घोडदौड चालूच ठेवली.

आज गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण या निर्णयाला सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या वीस षटकात सहा गड्याच्या मोबदल्यात 195 धावांची मोठी धावसंख्या रचून चुकीचे ठरवले. युवा अभिषेक शर्माचे आणखी एक अर्धशतक, त्याला मार्करमने दिलेली साथ आणि तळातल्या शशांक सिंगने केवळ 6 चेंडूत मारलेल्या 25 धावा हे हैदराबाद संघाच्या डावाचे खास वैशिष्ट्य ठरले.

खरेतर हैदराबाद संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कर्णधार केनला 5 वर तर राहुल त्रिपाठीला 16 धावांवर बाद करून मोहम्मद शमीने जोरदार सुरुवात करून दिली. यावेळी हैदराबाद संघाची अवस्था दोन बाद 44 अशी झाली होती, मात्र अभिषेक शर्मा आणि एडीन मार्करम या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी करत डाव चांगलाच सावरला. 21 वर्षीय युवा डावखुरा अभिषेक शर्मा सातत्याने जबरदस्त टेम्परामेन्ट दाखवत खेळत आहे. त्याने आजही तसेच खेळत आपले दुसरे अर्धशतक पूर्ण करताना हैदराबाद संघाच्या धावसंख्येला चांगलाच आकार दिला.

त्याला मार्करमनेही आपले तिसरे अर्धंशतक पुर्ण करत उत्तम साथ दिली. ही जोडी चांगलीच सेट झाली आहे असे वाटत असतानाच अभिषेक शर्मा 65 धावावर अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला, त्यानंतर निकोलस पुरन, सुंदर आणि मार्करम थोड्याफार फरकाने बाद झाले आणि हैदराबाद संघ 6 बाद 162 अशा बिकट परिस्थितीत आला.

यावेळी हैदराबाद संघ चांगलाच अडचणीत आहे असे वाटत असतानाच शशांक सिंगने केवळ 6 चेंडूत तीन षटकार आणि एक चौकार मारत नाबाद 25 धावा चोपल्या आणि संघाला 195 धावांची मोठी मजल मारून दिली.विशेष बाब म्हणजे शशांक सिंगची ही पहिलीच इंनिंग होती. मार्करमने 40 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकार मारत 56 धावा करत संघासाठी चांगलेच योगदान दिले.गुजरात संघाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी घेतले तर त्याला यश दयाल आणि जोसेफने एकेक गडी बाद करत चांगली साथ दिली.

गुजरात संघाने यावर्षीच्या आयपीएलमध्ये जरी पदार्पण केले असले तरी त्यांनी सामन्यागणिक जोरदार खेळ करत तब्बल सहा विजय मिळवून पदार्पणातच आपला दबदबा निर्माण केला असल्याने त्यांना हे आव्हान फारसे मुश्कील नसेल असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते आणि त्यांना जराही निराश न करता वृद्धीमान साहा आणि शुभमन गीलने 46 चेंडूत 69 धावांची चांगली सलामी देत आपल्या संघासाठी जोरदार सुरुवातही करून दिली. यावेळी कधी नव्हे ते केन विल्यमसनला दडपण आलेले दिसत होते, पण केन हा उगाचच जगातला एक उत्तम कर्णधार आहे,याचीच प्रचिती देत त्याने आपल्या नेतृत्वशैलीची एक झलक दाखवत बघताबघता गुजरात संघाला हादरे द्यायला सुरुवात केली.

त्याने या स्पर्धेत आतापर्यंत सातत्याने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलीकचा अचूक वापर करून घेतला आणि मलिकनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना आधी शुभमन गीलला वैयक्तिक 22 धावांवर त्रिफळचित करून ही जोडी फोडली, यानंतर थोड्याच वेळात कर्णधार पंड्यालाही फक्त 10 धावांवर बाद करून आपल्या कर्णधाराला आणखी एक यश मिळवून दिले.

यावेळी गुजरात संघाची धावसंख्या 10 व्या षटकात दोन बाद 85 होती. त्यामुळे सामना समसमान अवस्थेत दिसत होता, त्यातच आज सलामीला आलेला वृद्धीमान साहा चांगल्याच लयीत दिसत होता. बघताबघता त्याने आपले 9 वे अर्धशतक पूर्ण केले,मात्र तो 68 धावांवर असताना च मलिकने त्याला पूर्णपणे स्थिर झालेला असतानाच त्रिफळाबाद करून त्याला साफ चकवले.  उमरान मलिकचा वेग आणि यॉर्करवर भलेभले क्रिकेटचे अभ्यासू फिदा झाले आहेत, आजही त्याने ते का हे सिद्ध करणारा मारा करून हैदराबाद संघाला लागोपाठ तीन बळीही मिळवून दिले.

साहाने फक्त 38 चेंडूत 11 चौकार आणि एक षटकार मारत 68 धावा केल्या, तो बाद झाला तेंव्हा गुजरात संघाची धावसंख्या तीन बाद 122 अशी होती, यानंतर उमरान मलीकने चमत्कार करत डेविड मिलर आणि अभिनव मनोहरलाही त्रिफळाबाद करत आपल्या पहिल्या पाच बळीचा अविस्मरणीय टप्पाही गाठला,योगायोग म्हणजे 5 ही बळी त्याने त्रिफळाचित करून मिळवले आणि यासाठी फक्त 25 धावा खर्च केल्या,मिलर आणि अभिनव मनोहरला त्याने आपल्या शेवटच्या षटकातल्या शेवटच्या दोन चेंडूवर बाद केले.

यानंतर गुजरात संघ बऱ्यापैकी संकटात आला होता, आणि विजय त्यांच्यापासून दूर दूर जात होता. शेवटच्या तीन षटकात 45 धावा हव्या असताना मैदानावर होते राहुल तेवतीया आणि रशीद खान,मात्र या जोडीने हार न मानता जोरदार फटकेबाजी करत 18 व्या आणि 19 व्या षटकात 23 धावा काढून लढाई चालूच ठेवली. राहुल तेवतीया आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्धच आहे,शेवटच्या षटकात 22 धावा हव्या होत्या आणि त्या रोखण्यासाठी तयार होता डावखुरा मार्को जान्सेन,पहिल्याच चेंडूवर राहुलने षटकार मारत जोरदार सुरुवात केली.

दुसऱ्या चेंडूवर मात्र मार्कोने एकच धाव दिली,पण तिसऱ्या चेंडूवर रशीद खानने खणखणीत षटकार मारुन सामन्यात रंगत निर्माण केली. आता तीन चेंडू 9 धावा, चौथा चेंडू निर्धाव, टेन्शन टेन्शन पाचव्या चेंडूवर रशीदने खेचला आणखी एक षटकार, प्रेक्षकांनी, हैदराबाद खेळाडूंनी नखे खायला सुरुवात केली. एक चेंडू 3 धावा असे रक्तदाब वाढवणारे समीकरण आणि रशीद खानने चमत्कार करत शेवटच्या चेंडूवर अविश्वसनिय षटकार मारत सामना जिंकून दिला,नव्हे हैदराबाद संघाच्या घशातला घास काढून गुजरात संघाला एक सनसनाटी आणि रोमहर्षक विजय मिळवून देत सातवा विजयही मिळवून दिला.

राहूल तेवतीया 21 चेंडूत 2 षटकार आणि चार चौकारासह 41 तर करामती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशीद खान 11 चेंडूत 4 षटकार मारत 31 धावांवर नाबाद राहिला, शेवटच्या षटकात 22धावा काढण्याचे कठीण आव्हान या जोडीने अतिशय लीलया पार पाडत एक अतिशय रोमांचक आणि सनसनाटी विजयही आपल्या संघाला मिळवून दिला. हा गुजरात संघाचा सातवा विजय आहे,जो त्यांना अंकतालिकेत प्रथम क्रमांक मिळवून देणारा ठरला.

अफलातून गोलंदाजी करत आपले पहिले 5 बळी मिळवणारा उमरान मलिकची अप्रतिम गोलंदाजी,अभिषेक शर्मा, मार्करम,शशी सिंगची उत्तम फलंदाजी या जोडीने शेवटच्या तीन षटकात वांझोटी ठरवून आपल्या स्फोटक फटकेबाजीचीच चर्चा पुढील कित्येक दिवस होत राहील अशीच खेळी करत एक अविस्मरणीय विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक

  • सनरायजर्स हैदराबाद –  6 बाद 195, अभिषेक शर्मा 65,त्रिपाठी 16,मार्करम 56,शशांक सिंग नाबाद 25, शमी 39/3, दयाल 24/1,जोसेफ 35/1 पराभूत विरुद्ध
  • गुजरात टायटन –  5 बाद 199, साहा 68,शुभमन 22,पंड्या 10, मिलर 17, तेवतीया नाबाद 41,खान नाबाद 31
    मलिक 25/5

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.