Manobodh by Priya Shende Part 22 : मनोबोध भाग 22 – मना सज्जना हीत माझे करावे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक बावीस.

मना सज्जना हीत माझे करावे
रघुनायका दृढ चित्ती धरावे
महाराज तो स्वामी वायुसुताचा
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा

समर्थ या श्लोकात मनाला सज्जन हो आणि आपलं हीत म्हणजे भलं किंवा चांगलं कर अशी इच्छा व्यक्त करतात. स्वतःचं हित पहाणं म्हणजे प्रत्येक वेळी स्वार्थी होणं असं नाहीये, ते जर जनकल्याणासाठी असेल, काही उच्चं सहेतूने असेल तर ते सर्वांसाठी चांगलं आहे पण त्यासाठी काय कर.

समर्थ म्हणताहेत की, हे मना, तू रघुनायकाला म्हणजेच परमेश्वराला चित्तांत दृढ करून ठेव. सतत तू परमेश्वराच्या भक्तीत रमून जा. त्यानेच तुझं हीत होणार आहे, भलं होणार आहे. चांगलं होणार आहे.. तू कुठेतरी न भरकटता, तुझ्या चित्तांत म्हणजेच चेतनेत परमेश्वराचे सतत चिंतन चालू असू देत.

ते तेव्हाच होईल जेव्हा, तुझं मन स्थिर असेल, सज्जन असेल. म्हणून समर्थ म्हणतायेत की, “मना सज्जना हीत माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे”..

या रघुनायकाला तुझ्या चित्ती ठेव जो की राजांचा महाराज आहे, सकलांचा स्वामी आहे. पवनपुत्र हनुमानाचा,वायुसूत मारुतीचा स्वामी आहे. वायुसुत जो कि स्वतः भक्ती ,युक्ती ,शक्ती ने श्रेष्ठ आहे. त्याचाही जो स्वामी, म्हणजे रघुनायक, श्रीराम, साक्षात परमेश्वर यांची तू भक्ती कर त्यांना तुझ्या चित्तांत स्थान दे.

तो परमेश्वर जो कल्याण करतो .सर्व जणांचा उद्धार करतो. जो की तिन्ही लोकांचा नाथ, स्वामी आहे. लोकत्रंय म्हणजे त्रैलोक्य, ज्यात स्वर्ग- पृथ्वी- पाताळ यांचा समावेश आहे. या तीनही लोकांचा स्वामी, जो सर्वांचा उद्धार करतो. त्याला तू आपल्या चित्तात, चेतनेत स्थान दे.

या श्लोकाकडे आपण नीट पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की, या लोकत्रयाचा नाथ म्हणजे त्रैलोक्याचा स्वामी, जो सकल जनांचा उद्धार करतो, जो वायुसुताचा म्हणजे हनुमानाचा स्वामी आहे. तोच राजांचा-महाराज आहे. अत्यंत दयाळू आहे. तसंच पापांचा संहार करणारा आहे. पराक्रमी आहे. तेजस्वी आहे. सकलांचा आदर्श आहे.

अशा स्वामीला, महाराजाला, नाथाला म्हणजेच रघुनायक श्रीरामाला, हे मना तू तुझ्या चित्तात ठेव. त्याची भक्ती कर. त्यावर प्रीती कर. त्यालाच सर्वस्व मान. जेणेकरून हे सज्जन मना, तुझं हीत होईल. प्रगती होईल. भलं होईल. तुझ्यासोबत तू समाजाचंही कल्याण करशील. रे सज्जन मना आपलं हित कर ज्यासाठी चित्तात त्या रघुनायकाचा, श्रीरामाचा, परमेश्वराचा सदोदीत निवास असू दे.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.