IPL 2022 LSG Vs MI : लखनऊने मुंबईला 36 धावांनी पराभूत करत मुंबईच्या उरल्यासुरल्या संपवल्या आशा

लखनवी नवाब कर्णधार के एल राहूलचे शतक ठरले लखनऊ संघासाठी मौल्यवान

एमपीसी न्यूज – मुंबई संघाच्या दुर्दैवाचे दशावतार या हंगामात तरी संपायला तयारच नाहीत. आधी फलंदाजी करा वा गोलंदाजी निकाल एकच मुंबई इंडियन्स पराभूत. हीच यावर्षीच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सची दुर्दैवी गाथा ठरली आहे. ज्या रोहीतच्या नेतृत्वशैलीचे कालपरवापर्यंत कशीदे गौरवले जात होते तो रोहित हाच की त्याचा कुणी क्लोन आता खेळत आहे अशी काळजी वाटावी अशी त्याची कामगिरी वैयक्तिक आणि सांघिकही होत आहे.कालही त्याचीच प्रचिती आली, पुनरावृत्ती झाली.

काल रोहीतने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि लखनऊ संघाच्या आक्रमक डीकॉकला केवळ वैयक्तिक 10 धावांवर बाद करून चांगली सुरुवातही केली पण हे सुख क्षणीकच ठरले.  के एल राहुल आणि मनीष पांडे या जोडीने पुढे खेळताना 58 धावांची भागीदारी करून डाव सावरला. फॉर्मसाठी झगडत असलेल्या मनीष पांडेला फॉर्म सापडला आहे असे वाटत असतानाच तो 22 चेंडूत 22 धावा काढून पोलार्डच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्यानंतर खतरनाक स्टोयनिस ,कृनाल पंड्या थोड्याफार फरकाने बाद झाले आणि मुंबई संघाला बऱ्यापैकी यश मिळत आहे असे वाटत असतानाच के एल राहुलने जबरदस्त आणि नेत्रदीपक फलंदाजी करत मुंबई इंडियन्स गोलंदाजी फोडून काढत आपले चौथे शतक काढत संघाला 168 धावांची बऱ्यापैकी सन्मानजनक मजल गाठून दिली. त्याने 62 चेंडूत 12 चौकार आणि चार षटकार मारत नाबाद 103 धावा केल्या. मुंबईसाठी पोलार्ड आणि मेर्दिथने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

आपल्या पहिल्या वहिल्या विजयासाठी 169 धावांचे लक्ष बलाढय मुंबईसाठी मोठे नव्हते, पण सांघिक कामगिरीचा अभाव असलेल्या मुंबई संघाला हे माफक आव्हानही झेपले नाही आणि त्यांच्या एकापेक्षा एक महान फलंदाजांनी हाराकिरी केल्याने त्यांना फक्त 136 धावाच करता आल्या आणि मुंबई संघाला सलग आठव्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले.

खरेतर मुंबई इंडियन्सची सुरुवात तशी बऱ्यापैकी चांगली झाली होती.  ईशान किशन आणि रोहीतने पहिल्या गड्यासाठी 43 चेंडू 49 धावांची चांगली सुरुवात करून दिल्यानंतर ईशान किशन 20 चेंडूत आठ धावा कुंथुन बाद झाला. पाठोपाठ युवा ब्रेवीसही फक्त 3 धावा करून तंबुत परतलाआणि हे कमी की काय म्हणून रोहीत सुद्धा आज चांगले खेळत असतानाच जणू दृष्टावला आणि 39 धावा काढून कृनाल पंड्याला आपली विकेट देऊन बाद झाला आणि मुंबई संघ पुरता अडचणीत आला.

त्यापाठोपाठ भरोशाचा यादवांचा सूर्यही आज चमकू शकला नाही आणि फक्त 7 धावा करून आयुष बदोनीची शिकार ठरला. यानंतर मुंबई संघाला पराभव स्पष्ट खुणावत असताना तिलक वर्माने थोडाफार प्रतिकार केला,पण त्याने फक्त मोठा पराभव टळला इतकेच. मुंबईसाठी त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणजे त्यांचे फक्त आठ गडीच बाद झाले.

तिलक वर्माने 38 धावा केल्या, तर पोलार्ड फक्त 19च धावा करू शकला, लखनऊ संघाकडून कृनाल पंड्याने सर्वाधिक तीन बळी घेत मुंबई इंडियन्सचे कंबरडे मोडले.हा मुंबई संघाचा सलग आठवा पराभव ठरला तर लखनऊ संघाचा हा पाचवा विजय त्यांना पहिल्या चार संघात स्थान मिळवून देणारा ठरला, या पराभवाने मुंबई संघ प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवू शकणार नाही हे कटू सत्य त्यांना आणखीनच डागण्या देवू गेला आहे.
लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुल सामन्यचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

  • लखनऊ सुपर जायंट्स – 6 बाद 168, राहूल नाबाद 103, पांडे 22, हुडा 10, पोलार्ड 8/2 विजयी
  • मुंबई इंडियन्स – 8 बाद 132, रोहीत 39, तिलक 38, पोलार्ड 19, कृनाल पंड्या 19/3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.