Pune News : सत्ता येते जाते अस्वस्थ होण्याचे कारण नाही, शरद पवारांचा फडणवीसांना टोला

एमपीसी न्यूज – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चाललंय ते राजकीय संस्कृतीला न शोभणारे आहे. सत्ता गेल्याने काहीजण अस्वस्थ आहेत. सत्ता गेल्यानंतर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. सत्ता येत असते जात असते, परंतु त्यामुळे इतकं अस्वस्थ होण्याचे कारणच नाही असं म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय घडामोडीवर देखील प्रतिक्रिया दिल्या. 

 

ते बोलताना म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु त्यांच्या धोरणावर टीका करावी. एकेरी उल्लेख करून वेडेवाकडे बोलणे हे राज्याच्या संस्कृतीत बसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे मी उद्धव ठाकरे म्हणून बघत नाही. ती एक संस्था आहे. परंतु या संस्थेचा मान न ठेवण्याची  भूमिका काही लोक घेत आहेत. महाराष्ट्र राज्याची जुनी परंपरा कशी आहे त्यावर पुन्हा येण्यासाठी आपल्याला काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

 

शरद पवार म्हणाले,  1980 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले. मात्र मी अस्वस्थ झालो नाही. सरकार बरखास्त झाल्याची माहिती समजल्यानंतर मी माझ्या काही मित्रांना निवासस्थानी बोलावून घेतलं. सामानाची आवरा आवर केली आणि दुसऱ्याच दिवशी इतर ठिकाणी राहायला गेलो. त्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी मैदानावर गेल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी शरद पवारांनी हनुमान चालीसा वादावर ही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले मशिदीवरील भोंगे याच्या प्रश्नावरून तोडगा काढण्यासाठी सरकारने बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय नेत्यांना यासाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणावर सर्वांनी निर्णय घेऊन सामोपचाराने प्रश्न काढावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.