Pimpri News : महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण त्वरीत हटवावे; जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज – संरक्षणपात्र झोपड्यांच्या हस्तांतरणाबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, रस्त्यावरील अनधिकृत वाहन पार्कींगवर कारवाई करावी, महापालिकेच्या ताब्यातील आरक्षित जागेवर झालेले अतिक्रमण त्वरीत हटवावी अशी मागणी नागरिकांनी जनसंवाद सभेत केली.

नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित आपल्या कामाकरीता प्रशासनासमवेत संवाद साधण्याचे माध्यम म्हणून जनसंवाद सभा प्रभावी ठरत आहे. प्रशासनाला जनतेसोबत जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याची ही नामी संधी असून जनसंवाद सभेसाठी येणा-या नागरिकांनी केलेल्या तक्रारवजा सूचनांवर केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांना अवगत करावे असे आदेश अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले.

21 मार्च 2022 पासून जनसंवाद सभांना सुरुवात झाली. प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळात जनसंवाद सभा पार पडतात. आज 6 वी जनसंवाद सभा संपन्न झाली. ई क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या सभेचे अध्यक्षस्थान अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी भूषविले.

त्यावेळी त्यांनी उपस्थित विविध विभागांच्या अधिका-यांना जनसंवाद सभेच्या कार्यपध्दतीबद्दल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, या सभेसाठी आलेल्या नागरिकांनी केलेल्या तक्रारवजा सूचनांवर केलेल्या कार्यवाहीचे उत्तर वेळेत दिले पाहिजे. गंभीर तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे. आपला दृष्टीकोन नेहमी सकारात्मक ठेवा. यंत्रणेमध्ये दोष असतील तर ते दूर केले पाहिजेत. जास्तीत जास्त नागरिकांचे समाधान जनसंवाद सभेच्या माध्यमातून झाले पाहिजे याकडे प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष द्यावे.

दरम्यान, आज झालेल्या अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे उप आयुक्त अजय चारठणकर, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 15,13,11,7,19,16,20,20 अशा एकूण 121 तक्रारीवजा सूचना प्राप्त झाल्या.

संरक्षणपात्र झोपड्यांच्या हस्तांतरणाबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, रस्त्यावरील अनधिकृत वाहन पार्कींगवर कारवाई करावी, महापालिकेच्या ताब्यातील आरक्षित जागेवर झालेले अतिक्रमण त्वरीत हटवावे, सार्वजनिक सुलभ शौचालयांमध्ये जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकरीता रॅम्पची व्यवस्था करावी, मनपाच्या आरक्षित जागेवर नामफलक लावावेत, तुटलेले ड्रेनेजचे चेंबर्स आणि इतर वाहिन्यांची दुरुस्ती करावी, रस्त्यावर कचरा फेकणा-यांवर कारवाई करावी, रस्त्यांची अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावी, धोकेदायक वृक्षांची छाटणी करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या प्रमाणपत्रधारक व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे, उंच भागावर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, रेडीमिक्स वाहनातून पडणा-या मालामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधितांना सूचना देऊन रस्ता तात्काळ स्वच्छ करावा आदी तक्रारीवजा सूचना आजच्या जनसंवाद सभेमध्ये करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.