IPL 2023 : मुंबई इंडियन्सवर चित्तथरारक 5 धावांनी विजय मिळवत लखनऊ संघाने केली प्ले ऑफ मधली जागा बळकट

मुंबईने घेतला पायावर पाडून धोंडा?

एमपीसी न्यूज(विवेक कुलकर्णी) : कधी मुंबई, कधी लखनऊ विजयी होईल असे वाटत असतानाच लखनऊच्या मोहसीन खानने शेवटच्या सहा चेंडूत फक्त 5 धावा देत खतरनाक टीम डेविड आणि कॅमेरोन ग्रीनला रोखत संघाला चित्त्तथरारक विजय मिळवून देत प्ले ऑफची जागाही जवळजवळ पक्की करून दिली(IPL2023) आहे.

Dehu : जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदीतील मासे मृतावस्थेत

आज लखनऊ येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागताच रोहीत शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.लखनऊच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. बेहरनडॉफने आपल्या दुसऱ्या आणि लखनऊच्या डावाच्या तिसऱ्याच षटकात सलामीवीर दिपक हुडा आणि प्रेरक मंकडला सलग दोन चेंडूवर तंबूत परत पाठवून सामन्यात सनसनाटी निर्माण केली.

यावेळी लखनऊ संघाची धावसंख्या दोन बाद 12 अशी होती, यात केवळ 23 धावांची भर पडलेली असतानाच पीयूष चावलाने डीकॉकलाही बाद केले व लखनऊ संघाची अवस्था 3 बाद 35 अशी झाली.यानंतर मात्र कर्णधार कृनाल पंड्या आणि मार्कस स्टोयनिस ही जोडी एकत्र आली आणि जमलीही.या दोघांनीही खास करून स्टोयनिसने मुंबईच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला करत संघाचा डाव चांगलाच सावरला. कृनाल पंड्या 49 धावांवर असताना जायबंदी झाल्याने रिटायर हर्ट झाला, पण त्याने संघासाठी खूप मोठे योगदान दिले होते.

त्यानंतर स्टोयनिसने आणखी स्फोटक खेळी करत संघाला नुसते संकटातून बाहेरच काढले नाही तर संघाला विजयासाठी हव्या असलेल्या सन्मानजनक धावसंख्याही उभारून दिली. स्टोयनिसने केवळ 47 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकार मारत घणाघाती नाबाद 89 धावा करत संघाला 177 ही चांगलीच धावसंख्या गाठून दिली. एकवेळ अशी होती की लखनऊ संघाला 150 धावाही गाठणे मुश्किल वाटत होते, पण स्टोयनिसने हे अवघड काम अतिशय सोपे करत मुंबई गोलंदाजांच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड्या केल्या.

या मोठया धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी आणि प्ले ऑफ मधली आपली जागाही पक्की करण्यासाठी मुंबई संघाला जशी हवी होती अगदी तशीच सुरुवात ईशान किशन आणि रोहीतने करून दिली. ईशान किशन मागील काही सामन्यापासून चांगल्याच फॉर्मात आहेच,पण आज रोहीत ही चांगल्या लयीत आलाय असे वाटत होते.

Pune : पोलीस कोठडीमध्ये एकाची आत्महत्या; विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

या जोडीने 90 धावांची सलामी देत संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिलीच होती की मुंबईच्या या सुखचित्राला नजर लागली.चांगले खेळत असलेल्या रोहितला रवी बिष्णोईने हुडाच्या हाती झेल द्यायला लावून 37 धावांवर बाद केले.या धावा 25 चेंडूत आल्या ज्यात 3 षटकार आणि एक चौकार सामील होता.या धक्क्यातून सावरण्याआधीच ईशान किशनही 59 धावांवर असतानाच बिष्णोइची दुसरी शिकार ठरला.

चांगल्या सुरुवातीनंतर अशी परिस्थिती आपल्याच हाताने ओढवून घेणे मुंबई संघासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठीही नवीन बाब नाही, अन इतक्या धडाकेबाज सुरुवातीनंतरही काळजी करावी असे काहीच नव्हते ,कारण अजून “स्काय” शाबूत होता,त्याचा मागील काही सामन्यापासून असलेल्या फॉर्मच्या जोरावर मुंबई कोणालाही कधीही हरवू शकते असे मुंबई इंडियन्सला वाटणे काहीही गैर नव्हते ,पण आज नेमके तोच सुर्याही केवळ 7 धावांवर यश ठाकूरच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला अन लखनऊच्या गोटात एकच हर्षोल्हास झाला अन मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले .

त्यात भर पडली जेव्हा युवा नेहल वढेराही मोहसीन खानच्या गोलंदाजीवर 16 धावा करून झेलबाद झाला.यावेळी लखनऊ संघाला विजय आणि प्ले ऑफ मधली जागा जवळपास पक्की झाली असेच वाटत होते.मात्र लखनऊ आणि विजयाच्या मध्ये उभा होता तो खतरनाक टीम डेविड, ज्याला चेंडू मैदानाबाहेर मारण्याची सवय आहे आणि ज्याच्या बॅट अन मनगटात ती ताकत आहेही, त्याने तीच दाखवत लखनऊ संघाला जेरीस आणायला सुरुवात केली.

त्याने 3 उत्तुंग षटकार मारत धावा आणि विजयातले अंतर कमी करायला सुरुवात केली होतीच,अखेर शेवटच्या सहा चेंडूत 11 धावा असे समीकरण असताना पहिल्या दोन चेंडूत युवा मोहसीनने एकच धाव देत जबरदस्त टेम्परामेन्ट दाखवले,तिसऱ्या चेंडूवरही एकच धाव आली ,आता तीन चेंडू 9 धावा ,चौथा चेंडू अप्रतिम यॉर्कर, त्यामुळे आता 2 चेंडू अन 9 धावा ,पुन्हा 5 वा चेंडू आणखी एक जबरदस्त यॉर्कर,अन शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकच धाव देत मोहसीनने जबरदस्त षटक टाकत आपल्या संघाला एक अविस्मरणीय विजय मिळवून देताना आपल्या संघाला प्ले ऑफसाठी जवळपास पात्र ठरवले.

तर मुंबईला आता शेवटच्या सामन्यातल्या निकालावर अवलंबून रहावे लागेल अशीच परिस्थिती सध्या तरी दिसत आहे,आता मुंबई 14 अंकासह (IPL 2023)चौथ्या क्रमांकावर आहे,आता मुंबईच्या मागे 12 अंकासह आरसीबी असले तरी त्यांचे अजुन दोन सामने बाकी आहेत,त्यांनी ते दोन्हीही जिंकले अन मुंबई खुदा न खासता शेवटच्या सामन्यात पराभूत झालेच तर मुंबई संघाने आज हातातोंडाशी आलेल्या विजयाला पराभवात रूपांतरित करून आपल्याच हाताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे की नाही याचे उत्तर आता पुढील काही दिवसांतच मिळेल.घणाघाती फलंदाजी करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे पिसे काढणारा मार्कस स्टोयनिस सामन्याचा मानकरी (IPL 2023)ठरला.

संक्षिप्त धावफलक
लखनऊ सुपर जायंट्स
3 बाद 177
पांड्या निवृत्त 47,डीकॉक 16,स्टोयनिस नाबाद 89
बेहरनडॉफ 30/2, चावला 26/1
विजयी विरुद्ध
मुंबई इंडियन्स
5 बाद 172
रोहीत 37,ईशान 59,वढेरा 16,टीम डेविड नाबाद 32
बिष्णोई 26/2,यश ठाकूर 40/2

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.