Sangavi News : धक्कादायक! फटाके वाजवू नको म्हटल्याने पत्रकारावर भिरकावला लोखंडी रॉड

आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमातील प्रकार

एमपीसी न्यूज – फटाके वाजवू नको म्हटल्याने दमदाटी करून शिवीगाळ करत, पत्रकारावर लोखंडी रॉड भिरकावला. तसेच, तुला तोडतो अशी धमकी देऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखील शिवीगाळ केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात संगमनगर चौक, जुनी सांगवी येथे बुधवारी (दि.13) रात्री 11.30 वा ही घटना घडली. याप्रकरणी तीन जणांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

आदित्य उर्फ पक्या बाळु कांबळे (वय 23, रा. नारायण मंदीर, जुनी सांगवी), प्रथम सुनिल वैराट (वय 21, जुनी सांगवी), यश दिपक सांवत (वय 19, पवनानगर, जुनी सांगवी) असे अटक आरोपींची नावे आहेत. इतर दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल आहे.

पत्रकार यशपाल काशिनाथ सोनकांबळे (वय 38, रा. जुनी सांगवी, मुळगाव- उमरगा, उस्मानाबाद) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनगर चौक, जुनी सांगवी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. सामुदायिक धम्म प्रार्थना झाल्यानंतर दोन दुचाकीवरून आरोपी त्या ठिकाणी आले व फटाके वाजवू लागले. फिर्यादी यांनी आरोपींना फटाके “येथे वाजवू नको, लांब वाजव” अशी विनंती केली. त्यावर आरोपीने फिर्यादीला तु स्वत:ला मंडळाचा अध्यक्ष समजतो का, उद्या जयंतीचे कसे नियोजन करतो तेच बघतो? अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना व त्यांच्या पत्नीला अश्लिल शिवीगाळ केली तसेच, लोखंडी रॉड फेकून मारला तो फिर्यादी यांनी चुकवला.

आरोपींनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून, दमदाठी केली तसेच, तुम्ही जयंती कशी साजरी करता अशी धमकी दिली. दुचाकीच्या सायलेन्सर मधून कर्णकर्कश आवाज काढून तिथून पळ काढला. याप्रकरणी तीन आरोपी अटक असून, सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.