Junnar : पिंपळवंडी गावात एका घरात आढळला स्फोटकांचा मोठा साठा

एमपीसी न्यूज- जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका व्यक्तीच्या घरात स्फोटकांचा साठा आढळून आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राजाराम अभंग असे या व्यक्तीचे नाव असून रात्री उशीरा पोलिसांनी त्याचा घरावर छापा टाकून ही कारवाई केली. त्याच्या घरातून 59 शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. 

पुणे एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून हा साठा का करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या कारवाईत स्फोटक साहित्यांसह 5 पाईप बॉम्बकट्टे आणि रिव्हॉल्व्हर, तलवार व धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. स्फोटके काही दिवसांपुर्वी राजाराम अभंग याच्याकडे अशीच काही स्फोटके आढळून आली होती. राजाराम हा बॉम्ब बनवण्याचा शौकिन असल्याची माहिती पुढे आली आहे. 2004 मध्ये घरगुती वादातून गावातच त्याने बॉम्ब उडविला होता.

राजाराम अभंग याला रात्री पोलिसांनी अटक केली असून आज, बुधवारी जुन्नर न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागात स्फोटकांचा साठा आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.