Kamshet : हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ

एमपीसी न्यूज – लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघ व ‘श्री विठ्ठल परिवार, मावळ’ यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास गुरुवारी (27 डिसेंबर) हजारो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने हे या सप्ताहाचे खास वैशिष्ट्य आहे.

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुनील शेळके यांच्या पुढाकाराने होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तीन जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात पहाटे चार ते सहापर्यंत काकडआरती, सकाळी सात ते आठ श्रीविठ्ठल जप, आठ ते नऊ अल्पोपहार, नऊ ते दहा श्री विठ्ठल जप, 10 ते दुपारी 12 कीर्तन, दुपारी 12 ते तीन भोजन व विश्रांती, दुपारी तीन ते ते चार प्रवचन, संध्याकाळी चार ते पाच हरिपाठ, संध्याकाळी पाच ते सात भजन, संध्याकाळी सात ते रात्री नऊ कीर्तन, रात्री नऊ ते दहा महाप्रसाद व रात्री दहा ते पहाटे चार हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवारी अरुणमहाराज येवले यांचे भजन तर धर्मराजमहाराज हांडे यांचे कीर्तन झाले. शुक्रवारी महेशमहाराज भगुरे यांचे भजन व बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन झाले. शनिवार राधाकृष्ण बुवा भरड यांचे भजन तर ज्ञानेश्वर तथा माऊली महाराज कदम यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी अदिनाथ महाराज सटले यांचे भजन तर विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे कीर्तन, सोमवारी कल्याणजी गायकवाड यांचे भजन तर संदीपान महाराज शिंदे यांचे कीर्तन, मंगळवारी रघुनाथ खंडाळकर, शुभम व सुरंजन खंडाळकर यांचे भजन तसेच बाळकृष्णदादा वसंतगडकर यांचे कीर्तन होणार आहे. दोन जानेवारीला सामुदायिक जागर व अनिल महाराज पाटील यांचे कीर्तन होणार आहे. तीन जानेवारीला सकाळी दहा ते दुपारी 12 या वेळेत पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे, असे सुनील शेळके यांनी सांगितले.

समारोपाच्या दिवशी सकाळी सात ते दहा दरम्यान भव्य दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. या सप्ताहात वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली असून मावळ तालुक्यातील भाविकांची मोफत प्रवासव्यवस्था करण्यात आली आहे. सप्ताहात सकाळी दहा ते दुपारी 12 या वेळेत मावळ तालुक्यातील निवासी कीर्तनकारांची कीर्तनसेवा होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.सप्ताहास उपस्थित असणाऱ्या सर्व माता-भगिनी,वडीलधारी मंडळी व सर्व भाविकांच्या जेवणाची व अल्पोपहाराची सोय करण्यात आली असून त्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व स्वयंसेवक सेवा करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.