KBC To Start Soon: आता ‘केबीसी’च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात

Shooting of 'KBC' will start soon सगळंच बंद असताना घरातून प्रोमो चित्रित करणे हा महानायकासाठीही फार सुखद अनुभव नव्हता.

एमपीसी न्यूज – आजही दूरचित्रवाणी संचावर ‘देवीयों और सज्जनों’ म्हटले की आपल्याला लगेच ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो आठवतो. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या दिलखुलास शैलीमुळे ‘कौन बनेगा करोडपती’ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. हिंदी केबीसी नंतर त्याचे अनेक भाषांमध्ये शो देखील झाले. मात्र आता प्रेक्षक आणि बिग बी यांच्यामधील पडदा हटण्याची चिन्हे आहेत. कारण आता केबीसीच्या 12 व्या पर्वाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. अमिताभ सेटवर परतले आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे झालेली टाळेबंदी यामुळे ‘केबीसी’च्या या 12 व्या पर्वाचे काम रखडले होते. टाळेबंदीच्या काळात अमिताभ यांनी घरीच केबीसीसाठी नोंदणीचे आवाहन करणाऱ्या प्रोमोचे चित्रण केले होते. मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आल्यानंतरही 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कलाकारांना चित्रीकरणात सहभाग घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते.

मात्र उच्च न्यायालयाने याप्रकरणीचे निर्बंधही रद्द केल्याने आता सगळेच अडथळे दूर होऊन केबीसीच्या सेटवर परतणे अमिताभ यांना शक्य झाले आहे. दरम्यान बिग बींनी सेटवरील काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.

‘गुलाबो सिताबो’ डिजिटली प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ केबीसीच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होते. मात्र टाळेबंदीत चित्रीकरणच ठप्प झाल्याने हा शोही रखडला होता. त्यातल्या त्यात घरातूनच चित्रीकरण पूर्ण करत शोचे प्रोमोज तयार करण्यात आले होते. सगळ्या प्रकारची काळजी घेऊन ते चित्रीकरण करण्यात आले होते.

सगळंच बंद असताना घरातून प्रोमो चित्रित करणे हा महानायकासाठीही फार सुखद अनुभव नव्हता. मात्र ‘अत्यंत नियोजनबद्ध आणि कष्टपूर्वक दोन दिवसांचे चित्रीकरण आम्ही एका दिवसातच पूर्ण केले’, अशी आठवण केबीसीच्या सेटवर परतलेल्या अमिताभ यांनी समाजमाध्यमांवर सांगितली आहे.

मागील काळात इतर मालिकांच्या चित्रीकरणाला वेग आला असला तरी ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणावर निर्बंध असल्याने अमिताभ यांना घेऊन शोचे चित्रीकरण सुरु करणेच शक्य नव्हते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर केबीसीच्या चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी खूप काळजी घेऊनच चित्रीकरण करावे लागत आहे, असेही अमिताभ यांनी सांगितले.

त्यातच जुलै महिन्यात अमिताभ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. जवळपास चार आठवडे नानावटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर 2 ऑगस्ट रोजी अमिताभ यांना घरी सोडण्यात आले होते. कोरोनावर मात करुन सेटवर चित्रीकरणासाठी परतलेल्या अमिताभ यांच्यासाठी आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

सुरक्षेसंदर्भातील सगळे नियम काटेकोर पाळूनच चित्रीकरण केले जात असल्याचे अमिताभ यांनी स्पष्ट केले आहे. ‘आयुष्य आता पुन्हा पहिल्यासारखे जगता येणार नाही, कोरोनाने सगळेच बदलून टाकले आहे’, अशी भावनाही अमिताभ यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.