Pimpri News: ‘मास्क वापरा’, पालिकेची भित्तीचित्राच्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती

फुगेवाडी आणि काळभोर नगर येथील उड्डाणपुलावर कोरोना संबंधित सुरक्षाविषयक माहिती देणारे विविध चित्रे साकारण्यात आली आहेत.

एमपीसी न्यूज – ‘मास्कचा वापर करा’, ‘एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवा’, ‘लहान व वृद्ध नागरिकांची काळजी घ्या’ असे संदेश देणारी चित्रे उड्डाणपुलाच्या भिंतींवर साकारत कोरोना विषयी जनजागृती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करत सार्वजनिक वाहतूक, जिम, सिनेमागृह, नाट्यगृह वगळता इतर सर्व आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ आणि ठिकठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, प्रशासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोना अजून नाहीसा झाला नाही त्यामुळे सर्वांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भित्तीचित्राच्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती करण्यात येत. फुगेवाडी आणि काळभोर नगर येथील उड्डाणपुलावर कोरोना संबंधित सुरक्षाविषयक माहिती देणारे विविध चित्रे साकारण्यात आली आहेत.

यामध्ये ‘मास्कचा वापर करा’, ‘एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवा’, ‘लहान व वृद्ध नागरिकांची काळजी घ्या’, तसेच ‘कोरोना योद्ध्यांचा आदर करा’, ‘सारे मिळूनी कोरोनाशी लढूया’ असे सामाजिक भावना आणि एकोप्याचे संदेश देणारी चित्रे साकारण्यात आली आहेत.

कोरोना अजून आपल्यातून हद्दपार झाला नसून त्याचं संकट कायम आहे. नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.