Pune News : पीएमपीएल ठेकेदारावर मेहरबान; लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई म्हणून 99 कोटी रुपये देणार

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने कोरोनामुळे झालेल्या लॉकडॉऊनच्या (Lockdown) काळात ज्या खासगी ठेकेदारांच्या बस जाग्यावरच राहिल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई म्हणून 99 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा विषय प्रलंबित होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

पीएमपी संचालक मंडळाच्या या बैठकला महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी चिंचव महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष, नितीन लांडगे, संचालक प्रकाश ढोरे, आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, व्यवस्थापक चेतना केरूरे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यामुळे खाजगी ठेकेदारांच्या अनेक बसेस तब्बल तीन महिने एकाच जागेवर उभ्या होत्या. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे यांनी ठोठावलेला ५० कोटी रुपयांचा दंड माफ 

तुकाराम मुंडे पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष असताना त्यांनी सुमार सर्विस देणार्‍या खाजगी बसेसना 50 कोटी रुपयांचा दंड लावला होता. यामध्ये बी. व्ही. जी. इंडिया, ॲन्टोनी गॅरेजेस, ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रसन्न पर्पल मोबिलीटी सोल्युशन्स या भाडेतत्त्वावर बस पुरविणाऱ्या कंपन्यांचा समावेश होता. हा सर्व दंड माफ करण्याचा निर्णय संचालक मंडळातर्फे घेण्यात आला आहे.

थांब्यावर बस न थांबविणे, मार्गावर बस उशीरा सोडणे, ब्रेकडाऊन आदी कारणांसाठी हा दंड होता. हा दंड अवाजवी असून करारातील अटींच्या विरोधात आहे, असे म्हणत या दंडाच्या विरोधात कंपन्यांनी न्यायालयातही अपील केले होते. तसेच पीएमपीने लवादही नियुक्त केला होता. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार या कंपन्यांचा दंड माफ करण्यात आल्याचे संचालक मंडळातर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.