Nigdi News : आता ठाकरे सरकारच्या घोटाळे बाजाची उलटी गिनती सुरु झाली – किरीट सोमैय्या

एमपीसी न्यूज – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने 158 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्याविरोधात भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाने पुणे जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, त्यांच्या मुलाने कंपनी नोंदणी करताना फसवणूक केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मंत्री अनिल परब यांनी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला असून त्याप्रकरणी दापोली न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. न्यायालयाने परब यांना आरोपी क्रमांक एक घोषित केल्याचा दावा करत आता ठाकरे सरकारच्या घोटाळे बाजाची उलटी गिनती सुरु झाल्याचा हल्लाबोल भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला.

ग्रामविकास मंत्री हनस मुश्रीफ यांच्या कंपनीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी सोमैय्या आज (शुक्रवारी) निगडीतील आरओसी कार्यालयात आले होते. भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, प्रदेश सचिव अमित गोरखे, मुख्य संघटक अमोल थोरात, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक उत्तम केंदळे आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना सोमैय्या म्हणाले, ”हसन मुश्रीफ, त्यांच्या मुलाने आणि जावायाने सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व अन्यांच्या विरोधात भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाने याचिका दाखल केली आहे. बंद पडलेल्या कंपनीतून पैशांचे मनी लॉन्ड्रींग केले. त्याविरोधातील पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील याचिकेवर सुनावणी झाली असून यासंबंधात एफआरआय दाखल होईल. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने जो 158 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्याच्यावर कारवाई होणार असा विश्वास आहे”.

”भारत सरकारची मुश्रीफ यांच्यावरील तक्रारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी क्रिस कार्पोरेट कंपनी स्थापन केली. त्याला कोरोनातील करोडो रुपयांची कंत्राटे मिळाली. त्या कंपनीची नोंदणी करताना किशोरीताई आणि त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर यांनी फसवणूक केली. त्याविरोधात भारत सरकारची गिरगाव न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्याच्याही चौकशीचे आदेश दिलेले आहेत”, असे सोमैय्या म्हणाले.

”उद्धव ठाकरे यांचे तिसरे मंत्री अनिल परब यांनी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला. त्यांनी कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. पण, भारत सरकारची दापोली न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. न्यायालयाने त्याची दखल घेतली असून त्यात परब यांना आरोपी क्रमांक एक घोषित करण्यात आल्याचा दावाही सोमैय्या यांनी केला. शिवसेना गृहमंत्र्यांच्या कामावर नाराज असल्याची नौटंकी केली जात असून ठाकरे आणि पवार हा मुद्दा विचलीत करत असल्याचा आरोप करत” सोमैय्या म्हणाले, ”अजित पवार यांनी 1200 कोटी रुपयांचा जरंडेश्वर कारखाना ढापला त्याचे शरद पवार यांनी पहिले उत्तर द्यावे”.

”उद्धव ठाकरे यांचे सीईओ अनिल परब यांच्यावर फौजदारी कारवाई सुरु झाली. त्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांना देता येत नाही. ठाकरे सरकारने पोलिसांचा माफियागिरीसाठी उपयोग केला आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नींची जालना साखर कारखान्यात गुंतवणूक आहे. त्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या व्यवहाराची चौकशी सुरु असून योग्यवेळेला योग्य कारवाई होणार आहे. तो कारखाना ईडीने जप्त केला आहे”, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.