Kothrud : कोथरूडमध्ये मनसेला धक्का; राज ठाकरे यांचे जवळचे पदाधिकारी मंदार बलकवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मंदार बलकवडे यांनी (Kothrud) आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. बलकवडे यांचा भाजप प्रवेश मनसेला धक्का मानला जात असून कोथरूडमध्ये भाजप बेरजेचे राजकारण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मंदार बलकवडे यांचा कोथरूड व पुणे शहरात दांडगा जनसंपर्क आहे. शहराच्या प्रत्येक भागात त्यांचा मित्र परिवार आहे. 2017 मध्ये त्यांनी प्रभाग 13 एरंडवणा, प्रभात रोड भागातून निवडणूक लढवली होती. भाजपचे वातावरण असतानाही त्यांनी लक्षवेधी मते मिळवली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळचे पदाधिकारी अशी त्यांची ओळख होती त्यामुळे बलकवडे यांचा भाजप प्रवेश मनसेसाठी धक्का तर भाजपसाठी फायदेशीर मानला जात आहे.

कोथरूडमध्ये भाजपची ताकद असली तरी भाजप इतर पक्षातील वजनदार (Kothrud) पदाधिकारी आपल्या पक्षात घेऊन बेरजेचे राजकारण करत असल्याचे मंदार बलकवडे यांच्या पक्ष प्रवेशावरून दिसत आहे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका अशा निवडणुका येणाऱ्या वर्षात होणार आहेत आणि त्या दृष्टीने भाजप कडून बांधणी चालली असल्याचे दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.