Pune News : नागरिकांना वेळ द्या, अधिकाऱ्यांना प्रशासक कुमार यांनी सुनावले

एमपीसी न्यूज – महापालिका सभागृहाची मुदत संपल्यावर विद्यमान महापालिका आयुक्त विक्रम कुमार हेच महापालिकेवर प्रशासक म्हणून कार्यरत झाले आहेत. 15 मार्चनंतर दोनच दिवसात सलग आलेल्या तीन सुट्टया यामुळे या आठवड्यापासून खऱ्या अर्थाने प्रशासकराज महापालिकेत सुरू झाल्याची प्रचिती आली आहे. प्रशासक विक्रम कुमार यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी निर्धारित करून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित न राहिल्यास त्यांच्या थेट कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून शहरात पदपथ, रस्त्यांवरील अतिक्रमणे, साईड मार्जिंग न सोडता केलेली बांधकामे, बॅनर, फ्लेक्स यावर कारवाई सुरू आहे. परंतु काही ठिकाणी सरसकट कारवाई न होता, काही अतिक्रमणांना पाठिशी घालून त्याकडे कानाडोळा केला जात आहे, तर अतिक्रमण कारवाई झाल्यावर काही तासातच पुन्हा तेथे जैसे थे परिस्थिती आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण कारवाई चेहरे पाहून करू नका असा सज्जड इशारा देत विक्रम कुमार यांनी, कारवाईत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना कुमार म्हणाले, महापालिकेच्या बहुतांशी विभागांनी उत्पन्नाचे ध्येय यंदा पूर्ण केले असल्याचे सांगितले. मिळकतकर विभागाकडून 1 हजार 700 कोटी रूपयांचा मिळकतकर वसुल करण्यात आला असून, यामध्ये 16 हजार 745 नव्या मिळकतींवर कर आकारणी सुरू करण्यात आली आहे़ या नव्या आकारणीतून 165 कोटी रूपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत, तर 5 हजार 957 व्यावसायिक मिळकतींवर केलेल्या कारवाईतून 870 कोटी रूपये व 36 कोटी रूपयांचे धनादेश मिळाले आहेत़ मिळकतकर विभागाबरोबरच बांधकाम विभाग, आकाशचिन्ह विभाग, पाणीपुरवठा विभागाकडून मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ झाली असल्याचे ते म्हणाले.

पाणी मीटरबाबत शुक्रवारी बैठक

समान पाणीपुरवठा योजनेतंर्गत बसविण्यात येणाऱ्या पाणी मीटरमुळे पाण्याचा प्रेशर कमी होत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणाहून आल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी येत्या शुक्रवारी बैठक घेतली जाणार असून, मीटर बसविल्यावर पाण्याचा प्रेशर कायम राहील यावर तोडगा काढण्यात येणार आहे. दरम्यान 15 मे पर्यंत शहरातील सर्व रस्ते पूर्ववत करून, पावसाळापूर्व कामे पूर्ण केली जातील असेही विक्रम कुमार यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.