Pimpri News : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी जाहीर केले. राजीनाम्याचा स्वीकार करण्याची विनंतीही त्यांनी पाटील यांना केली.

रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्याने त्यांनी पक्षाच्या महिला संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर या पुण्यातील आहेत. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहराध्यक्षपद त्यांनी सांभाळले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची महिलांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. सरकारने त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. त्यामुळे त्यांनी संघटनेतील पदाचा राजीनामा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.