Pune : शिशु गटात आरोही भामे तर खुल्या गटात विद्या ढेकाणे प्रथम

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा अंतिम फेरी

एमपीसी  न्यूज –   लहान मुलांच्या भावविश्वातील गमतीदार गोष्टी तसेच छोट्या-छोट्या प्रसंगातून रंजक नाट्य, मर्म विनोद यांचा सुंदर मिलाप नाट्यछटेत पाहायला मिळाला. समाजामधील विविध घटकांतील समस्यादेखील नाट्यछटेतून मुलांनी सुंदररित्या सादर केल्या. नाट्यछटा कधी पोटधरून हसायला लावते तर कधी डोळ्यातून अश्रू आणते. एकाच वेळी अनेक व्यक्तींच्या भूमिका रंगमंचावर जिवंत करण्याची ताकद नाट्यछटा कलाकारांमध्ये असते. त्यामुळे नाट्यछटेतून समाजाचे प्रतिबिंब पहायला मिळत असल्याचे मत प्रसिद्ध लेखिका लीनता माडगूळकर आंबेकर यांनी व्यक्त केले. नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. 

लेखिका लिनता माडगूळकर आंबेकर, डॉ. दिलीप गरुड यांच्या हस्ते बक्षीस समारंभ निवारा सभागृह, नवी पेठ येथे पार पडला. संस्थेचे माजी विद्यार्थी अभिनेते चिन्मय पटवर्धन यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी स्पर्धा प्रमुख अनुराधा कुलकर्णी, संस्थेच्या विश्वस्त दिपाली निरगुडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या कुलकर्णी यांनी केले.

कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सुमारे ५०० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची प्राथमिक फेरी ७ वेगवेगळ्या गटात झाली. यामध्ये शिशुगटापासून ते तरुण आणि ज्येष्ठांचा गटाचा समावेश होता. प्राथमिक फेरीतून ९५ नाट्यछटा अंतिम फेरीत पोहचल्या होत्या. स्पर्धेची प्राथमिक फेरी  पुण्यातील ७ केंद्रांवर पार पडली. यंदा स्पर्धेचे २७ वे वर्ष होते.
नाट्यछटा हा प्रकार सध्या केवळ मराठीत नाट्यसंस्कार कला अकादमीनेच सुरु ठेवलेला आहे. दिवाकरांच्या नाट्यछटा आजच्या आणि पुढच्या पिढीलाही प्रेरणादयी ठरतील, व्यक्तिमत्व विकासाला सहाय्यभूत होतील म्हणूनच या विचाराने १९९२ या वर्षापासून नाट्यसंस्कार कला अकादमीने कै.दिवाकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने “कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेला” सुरुवात केल्याचे नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी सांगितले.

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा निकाल

शिशु गट : प्रथम – आरोही भामे, द्वितीय – अन्वित हर्डीकर, तृतीय – ओजस बापट,  उत्तेजनार्थ – वेदिका ओक
१ली, २री : प्रथम – श्रीजय देशपांडे, द्वितीय – अर्णव कालकुंद्री, तृतीय – पूर्वजा
शिंदे, उत्तेजनार्थ- कृतिका जोशी, अक्षरा करकरे
३री,४थी : प्रथम – निषाद साने, द्वितीय – स्वरूपा झांबरे, तृतीय – पल्लवी माने, उत्तेजनार्थ- सई भोसले, विहान देशमुख, सनत देशपांडे
५वी, ६वी : प्रथम – ऋचा जाधव, द्वितीय – सई गुरव, तृतीय – अद्वैत राईलकर, उत्तेजनार्थ – सई आपटे, मुग्धा जोशी, स्वरांजली पाटील
७ वी, ८वी : प्रथम – अनुष्का जिरेकर, द्वितीय – ओजस दीक्षित, तृतीय – राही बिरादार
९वी, १०वी: प्रथम – चिराग बोरगावकर, द्वितीय – एंजल लोंढे
खुला : प्रथम – विद्या ढेकाणे, द्वितीय – अथर्व आगाशे
लेखन विभाग:
पालक : सायली देशमुख, समीर कुलकर्णी
शिक्षक : दीप्ती असवडेकर
विद्यार्थी: ईश्वरी थत्ते, मुग्धा देशपांडे, उत्तेजनार्थ – संचिता मोहोळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.