Pune : जीवनशैली बदलली तर आयुष्य खूप सुंदर आहे – नंदिनी देसाई

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचा उपक्रम

एमपीसी न्यूज – बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा हायब्रीड जीवनशैलीमुळे बळी गेल्याचे अनेकदा आपल्या वाचनात ऐकण्यात येते. बदललेल्या जीवनशैलीमुळे आज आपले आरोग्य धोक्यात आले आहे. सर्वांनी आहार आणि आरोग्य याबाबत नव्याने विचार करण्याची आणि त्यानुसार सध्याच्या जीवनशैलीत बदल करण्याची आवश्यकता आहे. असे मत प्रा. नंदिनी देसाई व शिल्पा कानकोणकर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने ‘जीवनशैली व व्यवसायातील यशस्वी मंत्र’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ‘जीवनशैलीतील बदल’ या विषयावर प्रा. नंदिनी देसाई आणि डॉ. शिल्पा कानकोणकर यांनी तर ‘यशस्वी व्यवसायातील मंत्र’ या विषयावर मनीष गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, महादेव शेंडकर, अरुण चीचिरिया, अनिल शर्मा, राम भोसले, अनिल नेवाळे, अनिल जमतानी, रवींद्र भावे, संतोष जाधव, संतोष भालेकर, बाळकृष्ण उ-र्हे, वर्षा पांगारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा उद्देश सांगताना रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे म्हणाले, वल्लभनगर एसटी बस आगारात परिवहन महामंडळाच्या वाहक, चालक यांना आराम करण्यासाठी काही खोल्या आहेत. त्या खोल्यांचे नूतनीकरण करण्याचे काम येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे. या कामासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुमारे दोनशे उद्योजकांनी उपस्थिती दाखवली.

डॉ. शिल्पा कानकोणकर म्हणाल्या, “सतत कुठल्यातरी ओझ्याखाली दबून गेल्याने आपण हसणं विसरून जातो. कित्येकदा लक्षात येतं की दिवसभरात आपण मनमोकळेपणाने हसलेलोच नाही. तेव्हा मस्त हसा आणि रिलॅक्स व्हा. आपल्या जीवन शैलीत परिवर्तन करताना आपल्या रोजच्या सवयींमध्ये किंवा आहारामध्ये आपण थोडेसे बदल केल्यास, पुढे उद्भवू शकणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारी वेळीच रोखण्यास मदत होऊ शकेल. मानसिक ताण-तणाव, शारीरिक थकवा हे आपल्या सततच्या धावत्या जीवनशैलीची वैशिष्ट्ये बनली आहेत.”

मनीष गुप्ता यांनी व्यवसायातील यशस्वी मंत्र याविषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अद्ययावत तंत्रज्ञानाच्या संपर्कात रहा. वरवर मिळणा-या यशाने हुरळून न जाता व्यवसायाचा तपशीलवार अभ्यास करा. प्रत्येक कामाचे नियोजन, पैशाचा योग्य वापर करा. आपल्या व्यवसायात गांभीर्याने लक्ष द्या.” यांसारखे मंत्र त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमासाठी डायरेक्टर फंड रेसिंगचे अरुण चिंचोरीया यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. सदाशिव काळे व महादेव शेंडकर यांनी केले. सूत्रसंचालन रो. अशोक शिंदे यांनी केले. आभार रो. बाळकृष्ण उ-र्हे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.