Loksabha Election 2024 : ‘या’ दिवसापर्यंत सुरू राहणार मतदार नोंदणी

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाकडून निरंतर मतदार नोंदणीचा (Loksabha Election 2024) कार्यक्रम अद्याप सुरू आहे. राज्यात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्या त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्रमांक 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांना नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

मतदार यादी अद्यावत व शुद्ध करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. जुलै-ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून (Loksabha Election 2024) अर्ज प्राप्त करुन घेतले तसेच भावी मतदारांची माहिती घेतली आहे.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-2024

ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती जनतेला मिळावी यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृह निर्माण संस्थांच्या पदाधिकारांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत.

या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.

Loksabha Election 2024 : अशी असते आदर्श आचारसंहिता

दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातून तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस 5 लाख 99 हजार 166 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.

फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मयत झालेल्या मतदारांची वगळणी – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मयत मतदारांच्या संदर्भात विशेष मोहीम राबवून मतदार यादीचे जास्तीत जास्त शुध्दीकरण करण्यात आलेले (Loksabha Election 2024) आहेत.

या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. सन 2019 सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्याप पर्यंत 34 लाख 69 हजार 535 इतकी वाढ झाली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 929 महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन 2019 साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे 911 इतके होते. याकरिता महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे 2024 मध्ये या प्रमाणात 923 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

18-29 वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 1 कोटी 78 लाख 84 हजार 862 एवढ्या नवीन मतदारांची नोंदणी सध्याच्या मतदार यादीत झालेली आहे. याशिवाय 1 लाख 18 हजार 199 इतक्या सेनादलातील मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण 5 लाख 99 हजार 166 इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्क्यांहून अधिक असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे.

अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 13 लाख 15 हजार 166 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील अद्यावत आकडेवाडीनुसार 52 हजार 908 मतदार 100 वर्षावरील (Loksabha Election 2024) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.