Lonavala : लोकशाही वाचवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या – मल्लिकार्जुन खरगे

एमपीसी न्यूज : देशातील लोकशाही (Lonavala) वाचवण्यासाठी व या देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. लोणावळ्यात आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराला त्यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना खरगे म्हणाले, मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आणली आहे. ती वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. डरेंगे तो मरेंगे, लडेंगे तो जितेंगे असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. अशोक चव्हाण यांचे नाव न घेता खरगे म्हणाले, ज्यांना पक्षाने सर्व काही दिलं अशी मंडळी घर सोडून जात आहे. जे कार्यकर्ते तुमच्यासाठी रक्ताचा पाणी करून तुम्हाला मोठे करतात, त्यांचा हा विश्वासघात नाही का ? पुर्वी पक्षाची ध्येयधोरणे पाहून लोकं पक्षात जात होती, आता मात्र मला काय मिळणार याचा विचार करून जात आहेत. हे लोकशाहीत घातक आहे.

Lonavala : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाची फसवणूक करू नये; जो शब्द दिलाय तो पाळावा – नाना पटोले

काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारा पक्ष आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या पक्षाची स्थापना झाली. एकता व संविधान याला सोबत घेऊन काॅंग्रेस पक्ष आजपर्यंत वाटचाल करत आला आहे. आज देशाचे संविधान धोक्यात आले आहे. बेरोजगारी वाढत आहे. महागाई वाढत आहे असे असताना मोदींचा उदोउदो म्हणजे देशाची बरबादी आहे. यासाठी आपल्याला लढायचे आहे असे खरगे यांनी सांगितले.

खरगे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी की गॅरंटी म्हणून फसव्या जाहिराती सुरू आहे. निवडणुकीच्या पुर्वी त्यांनी अशाच जाहिराती करत प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची गॅरंटी दिली होती. दरवर्षी 2 करोड नोकर्‍या, शेतकरी उत्पादन दुप्पट करणे अशा अनेक गॅरंट्या दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात काहीच हाती आलं नाही हे सरकार फसवं आहे.

ज्या संविधानाने गोर गरीबांना न्याय दिला, महिलांना मतदानाचा अधिकार दिला ते संविधान मोडीत काढण्याचे काम मोदी सरकार करत आहे. याकरिता हे प्रशिक्षण शिबिर संपल्यानंतर सर्वांनी आपापल्या भागात जाऊन जनजागृती करा, मतदारांना भेटा, परिस्थिती समजावून सांगा, बुथ लेवलचे कार्यकर्ते यांना सक्षम करा व काँगेस पक्षाची ध्येयधोरणे नागरिकांना सांगा. आपल्या भावी पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी लढावं लागेल त्याकरिता सज्ज व्हा असे आवाहन या शिबिरात मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रशिक्षणार्थींना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.