Lonavala : दोन हजार विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलन व लेजर शो मधून देशभक्तीचे सादरीकरण

एमपीसी न्यूज- मावळ वार्ता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागो हिंदुस्तानी या देशभक्तीपर कार्यक्रमात शहरातील तेरा शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांनी शिस्तबद्घ संचलन सादर केले. यामध्ये सर्वोत्कृष्ट संचलन सादर केल्याबद्दल डीसी हायस्कूल खंडाळा यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. तर रायवुड इंटरनॅशनल स्कूल (द्वितीय), गुरुकुल हायकस्कूल (तृतीय) व आॅक्झिलियम हायस्कूलला (उत्तेजनार्थ) पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

संत तुकाराम सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांच्या हस्ते मावळा पुतळा चौकात ह्या संचलन रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या प्राचार्या स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळ वार्ता फाऊंडेशनचे मानद अध्यक्ष संजय आडसुळे, अध्यक्ष जितेंद्र टेलर, कार्यक्रमाचे अध्यक्ष नवीन भुरट, डाॅ. किरण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी, झाशीची राणी, भगतसिंग, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस आदी देशभक्तांच्या वेशभूषेत सहभागी विद्यार्थी रॅलीचे आकर्षण ठरले होते. विद्यार्थ्यांप्रमाणेच बोहरी समाजाचे बॅन्ड पथक, गगनगिरी सिक्युरिटी, महाराजा बॅन्ड व शहरातील नागरिक देखील सहभागी झाले होते. पुरंदरे शाळेच्या मैदानावर शोभायात्रा व संचलनाचा समारोप झाल्यानंतर त्याठिकाणी देशभक्तीपर घटना व राष्ट्र पुरुषाच्या जीवनावर आधारित लेझर शो चे सादरीकरण करण्यात आले. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी रॅली दरम्यान दोन उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरण केले. मागील पंधरा वर्षापासून मावळ वार्ता फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून लोणावळा शहरात जागो हिंदुस्तानी या देशभक्तीवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

रुग्णवाहिका भेट

मावळ वार्ता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लोणावळा शहर व परिसरात राबविण्यात येणार्‍या सामाजिक कार्याची दखल घेत मावळ तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व फाऊंडेशनचे सदस्य रमेश पाळेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनला सामाजिक कार्याकरिता रुग्णवाहिका भेट दिली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकापर्ण सोहळा या कार्यक्रमात करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.