Lonavala : नगरपरिषद शाळांमध्ये 160 वाटसरुंची राहण्याची सोय

एमपीसी न्यूज  : लोणावळा शहर व परिसरात कामानिमित्त आलेल्या तसेच कामधंदे बंद झाल्याने पायी गावाकडे निघालेले अशा 160 वाटसरुंची लोणावळा नगरपरिषदच्या पंडित नेहरु विद्यालय व संत ज्ञानेश्वर विद्यालयात राहण्याची सोय केली आहे.

या मंडळींना लागणार्‍या सर्व जीवनावश्यक वस्तु, कपडे, आंथरुण, पांगरुनचे आज नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष गिरिष मुथ्था, दिलीप गुप्ता यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच त्यांना दोन वेळचे जेवण, नाष्टा देखिल पुरविण्यात येत आहे.
 हाताला काम नाही, पोटाला खायला नाही, डोक्यावर छत नाही, गावाकडे जाण्याची सोय नाही व जवळ पैसा देखिल नाही,  अशा भीषण कोंडीत ही मंडळी सापडली आहेत. कोणी अमरावतीचे, कोणी सांगली, सातारा, नगर भागातील तर कोणी मराठवाडा, विदर्भातील राहणारे आहेत. शासनाने नागरिकांना आहे तेथेच रहा स्थलांतर करु नका असे आवाहन करत सर्व जिल्ह्यांच्या सिमा बंद केल्याने ते आडकून पडले आहेत.
असे  160 वाटसरु लोणावळ्यात आहेत. त्यांना शाळांच्या वर्गखोल्या राहण्याकरिता देण्यात आल्या असून, सर्व परिसरात जंतुनाशक औषधे व पावडर फवारणी करण्यात आली आहे. आंघोळीकरिता पाणी, कोलगेट, ब्रश, साबण, तेल,  कपडे, सतरंज्या, ब्लँकेट आदी वस्तु पुरविण्यात आल्या असून, त्या नागरिकांना रहात असलेल्या परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी आरोग्य तपासणी देखिल करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.
लोणावळा नगरपरिषदेत ‘सोशल डिस्टन्सिंग’
 
लोणावळा नगरपरिषद कार्यालयात देखिल सोशल डिस्टन्सिंग पाळली जात आहे. कार्यालयात येणारे लोकप्रतिनिधी, शासकिय अधिकारी यांना कार्यालयात जाताना हॅन्ड सॅनिटायझर दिले जाते तसेच कार्यालयात खुर्च्या देखिल काही अंतर सोडून ल‍ावण्यात आल्या आहेत. सामाजिक दूरी ठेवूनच चर्चा केली जात आहे. तसेच कार्यालयांच्या बाहेरील बाकडे उलटे करुन ठेवण्यात आले असून, महत्वाच्या कामाशिवाय कोणी कार्यालयात येऊ नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी नगरपरिषदेत भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला ही बैठक देखिल सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुनच झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.