Lonavala : आता ‘त्या’ दानशूरांवरच होणार कारवाई : लोणावळा शहर पोलिसांचा इशारा

एमपीसी न्यूज : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या लाॅकडाऊन व संचारबंदीच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासणाऱ्या व सोशल डिस्टंसिन्गचे पालन न करणाऱ्या दानशूरांवर कारवाई करण्याचा इशारा लोणावळा शहर पोलिसांनी दिला आहे.

संचारबंदी दरम्यान गरीब, उपाशी, हातावर पोट असलेल्या लोकांना मदत करावी. त्यांच्यासाठी काही तरी करावे, या उद्देशाने अनेक दानशूर मंडळी, विविध सेवाभावी संघटना आणि सामाजिक संस्था पुढे येत आहेत. यामागे मदतीची एक चांगली भावना असली तरीही करोनाच्या पार्श्वभूमीवर शा दानशूर लोकांची तसेच स्वयंसेवी संस्थाच्या स्वयंसेवकांची वाढती संख्या आणि त्यांचा उत्साह नगरपरिषद व पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. अत्यावश्यक सेवेचे स्टिकर लावून गावात फिरणार्‍या वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढली आहे.

लोणावळा शहर व ग्रामिण परिसरातील वाड्यावस्त्यांवर डोंगर भागात कातकरी, ठाकर या आदिवासी समाजातील लोक वस्ती करून राहत आहेत. नगरपरिषदेच्या आकडेवारीनुसार त्यांची संख्या आठशे ते नऊशे आहे. तसेच झोपडपट्टी बहुल भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत.

मात्र, वाटपाचे योग्य नियोजन होत नसल्याने काही ठिकाणी वारंवार मदत व अन्न दिले जाते तर काही ठिकाणी काहीच मिळत नाही. याकरिता नियोजनबद्ध रीतीने अन्नधान्य व जेवणाच्या साहित्यांचे वाटप व्हावे, अशा सुचना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी सर्व प्रशासकिय यंत्रणांना दिल्या आहेत.

गरीब व गरजू लोकांना मदतीचा दिवसेंदिवस वाढता ओघ ही जरी चांगली बाब असली तरी लोक अन्नधान्य वाटपाच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्या अतिउत्साही लोकांमुळे संचार बंदीच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. काही महाभाग तर पेट्रोल पंपावर इंधन मिळावे, या हेतूने ‘आम्ही अन्न वाटप करीत आहोत’ असे कारण सांगून पेट्रोल पंपावर कर्मचारी व पोलीस तसेच होमगार्ड यांच्याशी हुज्जत घालत आहेत.

तसेच पोलीस ठाण्याकडे व नगरपरिषदेकडे स्वयंसेवक म्हणून पास मागत आहेत. त्यामुळे अशा दानशूरतेचा आव आणत संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर ही कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मंजुरीने गरजूंना शिस्तबद्ध व योग्य काळजी घेऊन विनामूल्य अन्न वितरित करणारे विविध जाती धर्माचे 27 अधिकृत स्वयंसेवक नेमण्यात आले असल्याची माहीती लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.