Lonavala : एकविरा देवी मंदिर परिसरात भाविकांना सुविधा द्या अन्यथा, स्वातंत्र दिनी बेमुदत उपोषण करणार

मावळ तालुका मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अशोक कुटे यांची मागणी; जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

एमपीसी न्यूज – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ल्याच्या आई एकविरा देवी मंदिर आणि लाखो पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ असलेल्या कार्ला लेणी येथे येणार्‍या पर्यटक तसेच भाविकांना सुविधा मिळत नाहीत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता 15 आॕगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवसापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा मावळ तालुका मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनाद्वारे कुटे यांनी विविध मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. यामध्ये वेहरगाव पायथा मंदिर ते देवघर पालखी मार्ग तयार करणे. पाच पायरी येथे बहुमजली इमारत बांधून पार्किंगची व्यवस्था करणे, एकविरादेवी मंदिराकडे जाणाऱ्या पाय-यांची दुरुस्ती करणे. पायरी मार्गावर पाण्याची व शौचालयाची सुविधा तसेच उन्हापासून सरंक्षणासाठी शेड बांधण्यात यावे, एकविरा देवी मंदिर कार्ला लेणी येथे वारंवार पडणाऱ्या दरडी कोसळणार्‍या भागाची पाहणी करुण योग्य उपाययोजना करण्यात याव्यात.

  • पायथा मंदिर लगत वनविभागाच्या हद्दीतील गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून असणाऱ्या टपर्‍या कायमस्वरुपी करण्यात याव्यात. पायथा मंदिर ते पाच पायरी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, एकविरादेवी रोडजवळील अनाधिकृत बांधकाम केल्याने रस्ता पाण्याखाली जात असाल्याने ही अतिक्रमण बांधकामे काढण्यात यावीत. पाच पायरी भागातील वनविभागाच्या जागेवर उद्यान करण्यात यावे, रस्त्यावर डीजे लावून आणि मद्यपान करुण हुल्लडबाजी करणाऱ्यावंर कारवाई करण्यात यावी.

एकविरादेवी पालखी सोहळ्यासाठी पायथ्या लगत तीन एकर जागा आरक्षित करण्यात यावी. तसेच वनविभागाद्वारे उपद्रव शुल्क नावाने टोल घेण्यात येणारा निधी एकविरा मंदिर आणि परिसर स्वच्छते करीता वापरण्यात यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

  • वारंवार मागणी करुन देखील या मागण्या पूर्ण होत नसल्याने 15 आॕगस्ट 2019 रोजी एकविरा देवी पायथा मंदिराजवळ बेमुदत उपोषणाला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती अशोक कुटे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.