LPG Gas Cylinder : एलपीजी गॅसच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ

एमपीसी न्यूज : एलपीजी गॅस सिलेंडर  वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी बजेटनंतर  एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  ने 4 फेब्रुवारी रोजी एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे.

इंडेनने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार गॅस सबसिडी नसणाऱ्या एलपीजीची किंमत मुंबई आणि दिल्लीमध्ये 25 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दरम्यान कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 6 रुपयांची घट करण्यात आली आहे.

14.2 किलोच्या एलपीजी गॅसची किंमत 694 रुपये होती, या वाढीनंतर आता सबसिडी नसणाऱ्या या एलपीजी गॅसची किंमत 719 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती बदलतात. पण या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी बजेट असल्याने त्या दिवशी किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

जानेवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. मात्र फेब्रुवारीमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने किंमती वाढल्याने ग्राहकांसाठी हा झटका मानला जात आहे. जानेवारीमध्ये कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.