Pimpri News: फरार आरोपीला घेऊन ‘एनसीबी’ पंच करायला लागली, हे कितपत बरोबर? – दिलीप वळसे-पाटील

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईतील ड्रग्ज कारवाईदरम्यान साक्षीदार म्हणून ज्या लोकांना बरोबर नेले. ते एका पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. तर, किरण गोसावी हा पुण्यातील फरासखान्याच्या केसमध्ये एका फरार आरोपी आहे. फरार आरोपीला घेऊन जर ‘एनसीबी’ पंच करायला लागली तर हे कितपत बरोबर आहे? असा सवाल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (शनिवारी)उपस्थित केला.

मुंबई क्रूझ पार्टी आणि ड्रग प्रकरणावरुन सध्या राज्यात गदारोळ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपाचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असा आरोप त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपैकी तिघांना सोडून देण्यात आले असून त्यातला एक व्यक्ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा असल्याचा दावाही मलिक यांनी केला. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर दौ-यावर असलेले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ”एनसीबीने कारवाई करताना साक्षीदार म्हणून ज्या लोकांना बरोबर नेले. ते एका पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. किरण गोसावी पुण्याच्या फरासखान्याच्या केसमध्ये एका फरार आरोपी आहे. फरार आरोपीला घेऊन जर एनसीबी पंच करायला लागली. तर, हे कितपत बरोबर आहे? मला माहिती नाही. किरण गोसावीला अजून अटक झालेली नाही. परंतु, पोलीस तपास करत आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.