Maharashtra News : काही निर्णय घेण्याची वेळ आली तर नागरिकांना वेळ दिला जाईल – अजित पवार

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ‘कोणताही निर्णय घेण्याची वेळ आली तर आज रात्री आठ वाजल्यापासून’ अशी घोषणा होणार नाही. नागरिकांना योग्य वेळ दिला जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उद्या रात्रीपासून नियमांची कठोर अंमलबजावणी होईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. अधिक उशीर झाला तर बेड, ऑक्सिजनची कमतरता आशा समस्या येतील. त्याबद्दल उद्योजकांशी बोलून तोडगा काढण्याचे काम सुरु आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली.

जेव्हा निर्णय घेतला जाईल, तेव्हा आज रात्री आठ वाजल्यापासून…. असे होणार नाही. एकतर निर्णय घेण्याची वेळ येऊच नये. पण जर वेळ आलीच तर एक दोन दिवस वेळ दिला जाईल. कुठं जायचं असेल, घरातील आवश्यक सामान आणायचे असेल तर गैरसोय होणार नाही. कामगार, नोकरदार जिकडच्या तिकडे अडकणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल.’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करा. लॉकडाऊन आणि मिनीलॉकडाऊनमध्ये वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबवावी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवाव्या लागतील. गरीब आणि मध्यमवर्गीयांना जगण्यासाठीची मदत राज्य सरकारने करावी. राज्यात रुग्ण का वाढत आहेत, याबाबत विचार विनिमय करणं गरजेचं आहे.”

विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील

# विकेंड लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी लागू असेल. मात्र रात्रीची संचारबंदीची वेळ रात्री आठ वाजता सुरु असल्याने विकेंड लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता होईल. हे विकेंड लॉकडाऊन सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत राहील.
# या काळात अत्यावश्यक सेवा सुरु
# रिक्षा, बस, लोकल, टॅक्सी सुरु
# भाजीपाला मार्केट सुरु
# हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार (पार्सल सेवा सुरु राहील)
# गृहनिर्माणची कामे सुरु
# प्रवासी वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरु
# मैदाने, सभागृह बंद
# सर्व धार्मिक स्थळे बंद
# उद्याने, समुद्रकिनारे, सिनेमागृह बंद
# धार्मिक, राजकीय कार्यक्रम बंद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.