SSC Result 2020 Declared: यावर्षीही मुलीच अव्वल, राज्याचा निकाल 95.30 टक्के

Maharashtra SSC Result 2020: 10th results announced, 95.30 percent students pass राज्यातील 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

एमपीसी न्यूज- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा बहुप्रतीक्षीत निकाल अखेर जाहीर झाला आहे. एकूण 95.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यातील 8630 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सर्वांत कमी औरंगाबाद विभागाचा  (92 टक्के) निकाल लागला.  सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 96.91 टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल 93.90 टक्के आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 3.01 टक्केने जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के लागला आहे.

विभागनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-

कोकण – 98.77 टक्के

पुणे- 97.34 टक्के

मुंबई- 96.72 टक्के

कोल्हापूर – 97.64 टक्के

नाशिक – 93.73 टक्के

औरंगाबाद – 92 टक्के

अमरावती – 95.14 टक्के

नागपूर – 93.84 टक्के

लातूर – 93.07टक्के

या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 मुलगे व 7 लाख 89 हजार 894 मुली आहेत. एकूण 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला एकूण विद्यार्थी 17 लाख 9 हजार 264 बसले होते.  त्यातील 15 लाख 1 हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दहावीच्या एकूण 60 विषयांची परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये 20 विषयांचा निकाल 100 टक्के टक्के लागला आहे. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 5,39,373 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 5,50,809 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 3,30,588 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 80,335 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील 22,580 शाळांतून 17,54,367 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 8,360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. मार्च 2020 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2019 च्या निकालाच्या तुलनेत 18.20 टक्के जास्त आहे. खासगीरित्या प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 42,309 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 73.75 टक्के आहे.

* गतवर्षीच्या तुलनेत निकालामध्ये 18.20 टक्क्यांची वाढ झाली आहे.

* कोकण विभागाची टक्केवारी सर्वाधिक असून  त्यांचा निकाल हा 98.77 टक्के इतका लागला आहे.

* औरंगाबादचा निकाल सर्वांत कमी 92 टक्के इतका लागला आहे.

* राज्यातील 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

संपूर्ण राज्यात नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून 4 हजार 979 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.

हे लक्षात ठेवा : गुरुवारपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान, तर छायाप्रतींसाठी 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

* येथे पहा निकाल

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

तसेच, शाळांना एकत्रित निकाल खालील संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

www.mahahsscboard.in

* असा पहा आपला निकाल

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

तसेच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसन क्रमांक नोंदवून 577666 या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.