Maharashtra : सत्ता संघर्षावर आज होणार फैसला?

एमपीसी न्यूज – दीड वर्षांपासून राज्यात  सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर (Maharashtra) आज  फैसला होणार  आहे.  शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सायंकाळी चार वाजता करणार आहेत.

Today’s Horoscope 10 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

दीड वर्षांपूर्वी म्हणजे 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करून काही आमदारांना आपल्या बाजूने वळवून घेतलं. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. ठाकरे गटाने एकनाथ शिंदे, भरत गोगावलेंसह 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली. त्याचवेळी आपलीच सेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटानेही उद्धव ठाकरेंच्या 14 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखले केली.

तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून निवडणूक आयोगात, निवडणूक आयोगाकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात  वर्ग करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मे महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता.नंतर वेळोवेळी निर्देश देऊन शेवटी 10 जानेवारीपर्यंत आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष आज सेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणार आहेत.

दरम्यान  अपात्रतेबाबतच्या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनवेळा भेट झाली होती. या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, राहुल नार्वेकर सध्या न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे त्यांनी याप्रकरणात आरोपी असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेणं बेकायदा आहे.

या टीकेला उत्तर देताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले,  मुख्यमंत्री भेटीबद्दल न्यायालयात तक्रार करणे म्हणजे उद्याच्या निकालावर दबाव टाकण्यासारखे आहे.आमदारांवरील अपात्रतेची सुनावणी सुरु असताना अन्य कामे करू नका असे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश नसल्याचे स्पष्ट करीत ते म्हणाले, की आमदार या नात्याने मतदारसंघातील योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मी गेलो होतो. मी अध्यक्ष आहे; पण त्याच वेळी आमदारही आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी भेटायला जाण्यात काहीही गैर नाही.

 विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी ठाकरे गटाने सुरू केली आहे. कारण विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर न्यायालयीन पुनर्विलोकन करता येते. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी तसे दाखले दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे समर्थक आमदार मात्र निकाल आपल्या बाजूने लागेल याबाबत आशावादी (Maharashtra) आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.