Mahavitaran : ‘महापॉवर-पे’द्वारे तब्बल 218 कोटींचा वीजबिल भरणा

एमपीसी न्यूज – प्रामुख्याने निमशहरी व ग्रामीण भागातील (Mahavitaran) वीजग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे तसेच लहान व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ या पेमेंट वॉलेटमधून पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 25 लाख 54 हजार 294 वीजग्राहकांनी 217 कोटी 46 लाख रुपयांचा भरणा केला आहे. आतापर्यंत 453 जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरणा केंद्र सुरु केले असून गेल्या वर्षात या वॉलेटधारकांना कमिशन म्हणून तब्बल 1 कोटी 27 लाख 71 हजार 470 रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.

ग्राहकांना वीजबिलांचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावा यासाठी महावितरणने स्वतःचे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे. वयाच्या 18 वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतो. हे वॉलेट मोबाईल किंवा संगणकाद्वारे वापरले जाते आणि डेबिट, क्रेडिट कार्ड व नेटबॅकिंगने रिचार्ज करण्याची ऑनलाइन सोय आहे. वीजबिल भरण्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येत आहे. ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक होण्यासाठी इच्छुकांनी महावितरणच्या विभागीय / उपविभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

पुणे प्रादेशिक विभागात गेल्या वर्षात पुणे जिल्ह्यामध्ये 1 लाख 32 हजार 741 ग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून 12 कोटी 39 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. यात संबंधित 72 वॉलेटधारकांना कमिशन म्हणून 6 लाख 63 हजार 705 रुपयांचे (Mahavitaran) कमिशन देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात 10 लाख 95 हजार 229 ग्राहकांनी वॉलेटद्वारे 92 कोटी 84 लाख रुपये वीजबिल भरले. यात संबंधित 182 वॉलेटधारकांना 54 लाख 76 हजार 145 रुपयांचे कमिशन देण्यात आले.

Bhosari : न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सचे 25 व्या वर्षात पदार्पण,वर्धापन सोहळा थाटात संपन्न

सांगली जिल्ह्यात 1 लाख 1 हजार 583 ग्राहकांनी वॉलेटद्वारे 8 कोटी 93 लाख रुपयांचा भरणा केला. यात संबंधित 33 वॉलेटधारकांना 5 लाख 7 हजार 915 रुपयांचे कमिशन देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात 1 लाख 77 हजार 946 ग्राहकांनी वॉलेटद्वारे 18 कोटी 45 लाखांचा भरणा केला. यात संबंधित 70 वॉलेटधारकांना 8 लाख 89 हजार 730 रुपयांचे कमिशन देण्यात आले. तर सातारा जिल्ह्यात 10 लाख 46 हजार 795 ग्राहकांनी 84 कोटी 85 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला. यात संबंधित 96 वॉलेटधारकांना 52 लाख 33 हजार 975 रुपयांचे कमिशन देण्यात आले.

आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या अर्जांची पडताळणी करून ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक म्हणून मंजूरी दिली जाते. त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेता येतो. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्काळ ‘एसएमएस’ दिला जात आहे. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. अशा प्रकारच्या वसूलीचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.