Chinchwad : माळ रातव्याचे वाचवले प्राण

‘अलाइव्ह’ सदस्य प्रशांत पिंपळनेरकर यांची तत्परता

एमपीसी न्यूज – मध्य वस्तीत न आढळणा-या रातवा पक्ष्याचे प्राण अलाइव्ह संस्थेचे सदस्य प्रशांत पिंपळनेरकर यांची तत्परता व प्रसंगावधानतेमुळे कावळ्यांपासून प्राण वाचले. त्याला थोडेसे उपचार व अन्न पाणी देऊन केजूबाईजवळ पवनानदीच्या घाटावर त्याला मुक्त करण्यात आले. 

अलाइव्हचे सदस्य आणि पक्षी अभ्यासक प्रशांत पिंपळनेरकर यांना चिंचवडगावात त्यांच्या सोसायटीच्या पार्कींगमधे दिनांक 19 जून 2019 रोजी सकाळी तीन कावळे एका चितकबर्‍या पक्ष्याला चोचीने मारत असल्याचे आढळले. त्याला जखम झालेली दिसत होती. पक्ष्याची ओळख करण्याच्या फंदात न पडता त्वरीत सुटका करण्याच्या उद्देशाने त्यांनी कावळ्यांना हाकलले. मात्र, दाद न देता कावळ्यांनी त्या पक्ष्याचा पंख पकडून उचलले आणि गेटजवळच्या उंबराच्या झाडावर बसून त्याला चोचीने घायाळ करु लागले. पुन्हा प्रशांत पिंपळनेरकर यांनी कावळ्यांना उडवून लावले आणि त्या धांदलीत पक्षी झाडावरुन खाली पडला. त्याला उचलण्यासाठी हात पुढे केला तर तो पक्षी चोच विस्फारुन आक्रमक झाला. कावळ्यांबरोबरच्या झटापटीने तो प्रचंड थकल्याचे जाणवत होते. झटापटीत पंखांना ईजा झाल्याने त्याला नीट उडता येत नव्हते. पिंपळनेरकर यांनी जवळच पडलेल्या छोट्या खोक्यात शिताफीने त्याला ठेवले आणि कावळ्यांचा हल्ला चुकवत घरात पोचले.

घरातीलच एका मोठ्या खोक्यात गवताचा बिछाना करुन पक्ष्याला त्यावर ठेवले. पक्षी अभ्यासक प्रशांत पिंपळनेरकर म्हणाले,”कावळ्यांशी झालेल्या झटापटीमुळे प्रचंड घाबरल्याने त्या पक्ष्याला ग्लानी आली होती. त्याला विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. त्याच्या दिसण्याच्या नोंदी करुन फोटो घेतले. हा ‘रातवा’ पक्षी असल्याचे आढळून आले. मात्र, मध्यवस्तीत त्याचा अधिवास नसल्याने मी चक्रावलो. ओळख पटवण्याची खात्री करण्यासाठी पक्षीतज्ज्ञ उमेश वाघेला आणि श्रीकांत बडवे यांची मदत घेतली. दोघांनीही हा पक्षी ‘रातवा’च असल्याचे सांगितले. तसेच काय काळजी घ्यायची याचेही मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे योग्य कृती करत रात्री रातव्याला पुन्हा निसर्गात सोडायचे ठरवले.”

पक्षीतज्ज्ञ उमेश वाघेला म्हणाले, ”रातवा  चिंचवडच्या मनुष्यवस्तीत पहिल्यांदाच आढळला आहे. निशाचर रातव्याच्या महाराष्ट्रात एकूण सहा प्रजाती आढळतात. त्यापैकी चिंचवडगावात रेस्क्यू केलेला हा पक्षी निवासी असून ‘माळ रातवा’ किंवा ‘फ्रेंकलिनचा रातवा’ म्हणून ओळखला जातो. ओढ़े किंवा पाणवठ्याजवळील माळरान हा माळ रातव्याचा अधिवास आहे. ऐन मध्यवस्तीत हा भरकटत आला असावा. रात्री त्याला निसर्गात मुक्त करण्यासाठी आम्ही चिंचवडगाव परिसरात त्याच्या अधिवासाचा शोध घेतला. ‘माळ रातव्या’ला सुरक्षा आणि अन्न मिळेल याचा विचार करुन केजूबाईजवळ पवना नदीच्या घाटावर मुक्त करताच त्याने यशस्वी उड्डाण घेतले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.