Manchak Ipper : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा

एमपीसी न्यूज : जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो, करिअरमध्ये यश-अपयश हे अविभाज्य असून आयुष्यात उच्च ध्येय ठेवून, सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. असे मार्गदर्शन पोलीस उपायुक्त मंचक इप्पर (Manchak Ipper) यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे, मॉडर्न शैक्षणिक संकुल, निगडी येथील इ.१० वी व १२वी गुणवंताचा गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, व्यासपीठावर संस्थेचे उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, संस्था नियामक मंडळ सदस्य दिपक मराठे, मृगजा कुलकर्णी, राजीव कुटे, डॉ.प्रवीण चौधरी संस्थेच्या आजीव सदस्या सुहासिनी इटकर तसेच निगडी येथील शाखाप्रमुख प्रकाश पाबळे, गौरी सावंत व नरेंद्र चौधरी उपस्थित होते. या प्रसंगी निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आर. बी. उंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. निमंत्रितांमध्ये, सामाजिक कार्यकर्ते अनिल अढी तसेच प्रा.अशोक मुंडे, केशव घोळवे उपस्थित होते.

Swami Samartha : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा’ नामघोष करत ग्रंथदिंडीला प्रारंभ

Manchak Ipper
प्रास्ताविक स्वागत प्राचार्य प्रकाश पाबळे यांनी केले. परिचय सत्कार निवेदन दीपा वायकोळे यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते यशवंत विद्यार्थी व पालकांचा गौरव करण्यात आला. मंचक इप्पर यांनी आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करताना, उपस्थितांना प्रसंगी आत्मपरीक्षणही करण्यास भाग पाडले. विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक करिअर, स्पर्धा परीक्षा याचे महत्त्व सांगताना प्रत्येक आव्हानात सर्वोत्तम देण्याचा सल्ला दिला. उच्च ध्येय ठेवा, परंतु, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न करा. प्रसंगी अपयश आल्यास त्यास शेवट न मानता मार्ग किंवा पद्धत बदला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यश मिळतेच असे त्यांनी उदाहरणसह (Manchak Ipper) पटवून दिले.

इप्पर पुढील मार्गदर्शनात म्हणाले की, शालेय निकालात यशस्वी मुलींची संख्या जास्त आढळते. परंतु, पुढे याच मुली स्पर्धेतून बाहेर पडतात, पुढील करिअरच्या उच्च शिखरावर ती संख्या कमी दिसते. यासाठी त्यांचे आई वडीलच कारणीभूत आहेत, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, प्रत्येक वेळी यश गुणांवर अवलंबून नसते, आयुष्यातील प्रत्येक आव्हानात तुमचा आत्मविश्वास लढवय्या वृत्ती व सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो हे त्यांनी विषद केले.

यावेळी संस्थेच्या सदस्या मृगजा कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पुढील जगात वावरताना, आई-वडील व शिक्षकांनी केलेल्या संस्काराला न विसरता सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, जगातील वाईट गोष्टीपासून जाणीवपूर्वक दूर राहून सुयश मिळवा अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गुंड यांनी केले. बक्षीस यादी वाचन प्रशांत कुलकर्णी, विद्या डांगे व सोनाली गांवकर यांनी केले व शेवटी आभार, मुख्याद्यापिका गौरी सावंत यांनी मानले. कार्यक्रमात ईशस्तवन पसायदान अमृता कुलकर्णी यांनी सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.