Manobodh by Priya Shende Part 28 : मनोबोध भाग 28 – दीनानाथ हा राम कोदंडधारी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 28

दीनानाथ हा राम कोदंडधारी

पुढे देखता काळ पोटी तरारी

मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

श्लोक क्रमांक 28 ते 37 या दहा श्लोकात समर्थांनी शेवटचा चरण हें, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असं केलं आहे. या श्लोकात समर्थ श्रीरामांच वर्णन करत आहेत आणि त्यांची महती सांगत आहेत. ते म्हणताहेत की राम कसा आहे तर, कोदंडधारी आहे. म्हणजेच धनुर्धारी आहे. जसे हनुमान, भीम गदाधारी आहेत. श्रीकृष्णं हे सुदर्शन चक्रधारी, बलराम हलधारी. तसेच श्री राम धनुर्धारी म्हणजेच कोदंडधारी आहेत. तसेच त्यांना दीनानाथ म्हणलंय म्हणजे दीन, अनाथ, गरीब यांना प्रेमाने बघणारे आहेत. त्यांच्यावर कृपा करणारे आहेत. त्यांच्या भक्तांवर कृपा करणारे असे दयाळू आहेत. याचा अर्थ असा की ते, महापराक्रमी पण आहेत आणि अत्यंत कृपाळू पण आहेत. आपण जर चौफेर नजर टाकली तर, आपल्याला सहज समजून येईल की, दोन्ही गुण एकाच व्यक्तीत बघायला मिळणं, ही किती दुरापास्त गोष्ट आहे. त्यामुळे असे असामान्य परमेश्वर, आपले प्रभू श्रीराम आहेत जे आपल्या पाठीशी आहेत.

तसच पुढे समर्थ म्हणताहेत की, “पुढे देखता काळ पोटी थरारी”. समर्थ त्यांचे गुण सांगताना म्हणतायेत की, श्रीराम इतके सामर्थ्यशील आहेत की, साक्षात काळ त्यांच्यापुढे थरथर कापतो. काळ म्हणजे मृत्यू. सर समर्थ आपल्याला सांगत आहेत की जिथे काळ या प्रभू पुढे थरथर कापतो इतके बलशाली श्रीराम आहेत. जे कि धनुर्धारी सुद्धा आहेत. आणि अत्यंत कनवाळू देखील आहेत, अशा प्रभूला जर तू शरण गेलास, त्याच्यावर निस्सीम भक्ती केलीस, तर तुझ्या मदतीला तो नक्की धावून येईल. हा विश्वास ठेव. तू सर्वांचा तारण करत आहे. आपण सामान्य जीव आहोत. प्रापंचिक आहोत. आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार? त्याची कृपादृष्टी आपल्या सारख्या अगदी सामान्य माणसांवर होईल का, अशी शंका सुद्धा मनात आणू नकोस. आणि फक्त भक्ती कर. नामस्मरण कर. असं समर्थ सांगत आहेत. देव भक्तीचा भुकेला आहे. त्याची भक्ती करा तो कायम तुमच्या मदतीला आहे. तो धावून येईल तुमच्या हाकेला. त्याची आराधना करा. तू कोणाला उपेक्षित ठेवणार नाही.

त्यासाठी समर्थ पुढे म्हणतात की, “मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी”. ते मनाला आश्वासन देऊन सांगत आहे की, हे मना, हे सत्य तू कायम ध्यानात ठेव की, परमेश्वर नेहमीच तुझ्यासोबत आहे. तू फक्त त्याला आर्ततेने, प्रेमाने हाक मार.

तो तुझ्या हाकेला धावून येईल आणि पुढे जाऊन ते म्हणतात की,” नुपेक्षित कदा रामदासाभिमानी”.हे सत्य तू कायम ध्यानात ठेव की आपल्या भक्ताची परमेश्वर कधीही उपेक्षा करत नाही. त्याच्यावर विश्वास ठेव. तात्पर्य असं की जो, भगवंताच नामस्मरण करतो, क्रियमाण कर्म म्हणजे आपलं काम भगवंतच काम आहे, असं समजून करतो. आपलं कर्म करताना भगवंताचे नामस्मरण करत करतो. अशा भक्ताला तो एकटं ठेवत नाही. तो भक्त देवाला प्रिय असतो. मग तो सामान्य प्रापंचिक माणूस असला तरीही. कारण त्यात दीनानाथ आहे. गरीबांचा कैवारी आहे आणि काळा पासून संरक्षण करण्यासाठी धनुर्धारी आहे. म्हणून त्याचं कायम स्मरण ठेव. विश्वास ठेव की, तू त्याची भक्ती केली तर तो, तुझं कल्याण करणार आहे.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.