Maval : जनमताचा कौल मान्य, पराभवातून खूप काही शिकण्यासारखे – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – मावळच्या जनतेने दिलेला कौल आपण विनम्रपणे स्वीकारला आहे. या पराभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे. आत्मचिंतन करून झालेल्या चुका सुधारून आजपासून आपण पुन्हा मावळच्या जनतेच्या सेवेत कार्यरत झालो आहे, अशी प्रतिक्रिया मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार संजय तथा बाळा भेगडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली.

मावळ तालुक्यावर गेली 25 वर्षे असलेली भाजपची सत्ता या निवडणुकीतील पराभवामुळे संपुष्टात आली. भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर मावळातील जुन्या व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. राजकारणात जय-पराजय होत असतात. पराभवाने खचून न जाता, नव्याने पक्ष संघटनेची बांधणी करायला लागूयात, असे सांगून बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

विजयी झाल्याबद्दल प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील शेळके यांचे बाळा भेगडे यांनी अभिनंदन केले. मावळात असलेली सुप्त लाट शेवटपर्यंत लक्षात आली नाही, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. या निवडणुकीतील पराभवाच्या कारणांची मीमांसा केली तर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, असे ते म्हणाले.

केंद्रात व राज्यातही भाजपचीच सत्ता असल्याने यापुढेही मावळात विकासाची कामे करायला कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा त्यांनी केला. मावळातील अनेकजणांनी दीर्घकालीन फायदा लक्षात न घेता अल्पकालीन फायदा पाहिला, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

“पराभवाने खचून न जाता, आपण पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्याने बळ देऊन पक्ष संघटनेची पुन्हा बांधणी करण्यावर आपण भर देणार आहोत. पक्ष संघटना हीच आमची ताकद आहे. संघटना पुन्हा बलशाली करून मावळाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू”, असे बाळा भेगडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.