Maval : बारणे यावेळीही लाखोंच्या मताधिक्याने निवडून येणार – चंद्रकांता सोनकांबळे

पिंपरीत आरपीआय कार्यकर्त्यांची बैठक

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना या पक्षांची महायुती झाली आहे. येत्या निवडणुकीत आरपीआय पक्ष मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देत आहे. आरपीआयच्या पाठिंब्यामुळे बारणे पुन्हा एकदा विजयी होणार आहेत. त्याचबरोबर त्यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी व्यक्त केला.

पिंपरी येथील शिवसेना पक्षकार्यालयात शिवसेना-आरपीआय कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीसाठी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, शहराध्यक्ष योगेश बाबर, आरपीआयचे बाळासाहेब भागवत, रत्नमाला सावंत, उर्मिला काळभोर, सरिता साने, इलाबाई ठोसर, सम्राट जकात, लक्ष्मण गायकवाड, सुधाकर बारभुवन, प्रवीण ओव्हाळ, बाळासाहेब रोकडे, विलास कांबळे, कमळ कांबळे, लिंबराज कांबळे, राहुल मस्के, मारुती शिवशरण आदी उपस्थित होते. अमित मेश्राम यांनी बारणे यांचा जाहीर सत्कार करत पुढील काळात प्रचारासाठी सक्रियपणे साथ देण्याची ग्वाही दिली.

सोनकांबळे म्हणाल्या, “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाला आहे. पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी याबाबतचे आदेश आरपीआय कार्यकर्त्यांना दिले आहेत. पुढील काळात आरपीआय महायुतीसोबत काम करणार आहे. यामुळे सामाजिक एकोपा आणि सहकार्याची भावना वाढीस लागणार आहे. यातून बारणे यांचा लाखोंच्या मताधिक्याने विजय निश्चित आहे.”

आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, “आपली लढाई केवळ विचारांची लढाई आहे. विचारांचा वारसा घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आरपीआयने शिवसेनेला मदत केली आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांना पुढील काळात यामुळे जबाबदारी मिळणार आहे. कार्यकर्त्यांनी नाराज न होता, जोमाने काम करायला हवे. स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर मिळण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना राबवली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर मिळालं आहे. अशा अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आल्या आहेत. शिवसेना आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांना विविध समित्यांवर काम करण्याची संधी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गरिबांचा कैवारी म्हणून रामदास आठवले यांनी ओळखले जाते. त्यांच्यासोबत काम करत असताना अभिमान वाटतो.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.