Maval: टाकवे बुद्रुक येथे रात्री तरुण उद्योजकाचा निर्घृण खून

Maval: Brutal murder of a young entrepreneur at night at Takve Budruk

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे काल (शुक्रवारी) रात्री दहाच्या सुमारास एका तरुण उद्योजकाचा निर्घृण खून करण्यात आला. टाकवे-घोणशेत रस्त्यावर दोन मित्रांबरोबर फिरायला गेलेल्या या तरुणावर तीन मोटारसायकलवरून आलेल्या सात ते आठ जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख अद्यापि पटू शकलेली नाही तसेच खुनामागील कारणही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

यश रोहिदास असवले (वय 22, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) असे खून झालेल्या युवक उद्योजकाचे नाव आहे. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. शिक्षणाबरोबरच तो जेसीबीचा व्यवसायही करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा त्याच्या दोन मित्रांबरोबर नेहमीप्रमाणे रात्री जेवण झाल्यानंतर घोणशेत रस्त्यावर फिरायला गेला होता. टाकवे गावापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर असताना रात्री दहा ते सव्वादहाच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. तीन मोटारसायकलवर आलेल्या सात ते आठजणांनी धारदार शस्त्रांनी यशच्या डोक्यावर व हातावर वार केले. यश रक्त्याच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

गंभीररित्या जखमी झालेल्या यशला तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्याचा मृतदेह तळेगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यश याचा व्यावसायिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्या कारणांवरून कोणाशी वाद होता का, हे पोलीस तपासून पाहात आहेत. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा कामाला कामाला लागली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like