Maval : ‘संकटकाळात कामगारांना गरज असताना कंपनीने वेतन कपात करणे योग्य नाही’

औद्योगिक कर्मचाऱ्यांचे आमदार सुनील शेळके यांना निवेदन

एमपीसी न्यूज – कोरोना या विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे सरकारकडून सर्व स्तरावर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील सर्व औद्योगिक कंपन्या सुद्धा अनिश्चित काळासाठी बंद आहेत. त्यामुळे कामगार वर्ग घरीच आहे. अशा आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत औद्योगिक कंपन्यांनी कामगारांचे पगार कपात केलेत व काही कामगारांचे पगारच झाले नाहीत  त्यामुळे कामगारांना आर्थिक मदतीची गरज असताना कंपनीने केलेल्या अशा व्यवहारांवर कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

संपूर्ण कामगार वर्ग हा कंपनीच्या यशामागे ठामपणे उभा असतो, परंतु जेव्हा कामगारांना कंपनीच्या मदतीची  गरज आहे, तेव्हा वेतन कपात किंवा वेतनच न करणे, हा प्रकार योग्य नाही. लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला असल्यामुळे कामगार वर्गाला दैनंदिन गरजा भागविणे कठीण होत आहे. तसेच या प्रकाराची दखल घेऊन कामगारांना दिलासा द्यावा, असा सूर कामगारवर्गातून व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकारावर मार्ग काढण्यासाठी, कामगार वर्गाच्या वतीने विशाल लोखंडे व विकी नवघणे यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे विनंती अर्ज केला आहे. यावेळी उपस्थित आमदारांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांनी अर्जाची दखल घेत कामगारांच्या पाठीशी उभे राहू तसेच कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.