Maval News : कॅंटोन्मेंट हद्दीतील विकासकामांना सात कोटी 30 लाखांचा निधी : आमदार सुनील शेळके

एमपीसीन्यूज : महाविकास आघाडी सरकारकडून मावळ मतदारसंघासाठी तब्बल 711 कोटी 23 लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरीसह निधी मिळवण्यात आपल्याला यश मिळाले आहे. यामध्ये देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील विकासकामांसाठी आतापर्यंत सात कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करवून दिला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रविवारी ( दि. 28) पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, देहूरोड शहराध्यक्ष ॲड.  कृष्णा दाभोळे, लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जीवन गायकवाड, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे, महिला तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत, उपाध्यक्षा शैलजा काळोखे, नगरसेवक संतोष भेगडे,  वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, तळेगाव नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनीता काळोखे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील दाभाडे, संघटनमंत्री नारायण ठाकर, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सरपंच विजय सातकर, सरपंच सचिन शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील सोयी-सुविधांसाठी एक कोटी रुपये  निधी उपलब्ध झाला. धम्मभूमी सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सिद्धीविनायक नगरी  येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी या वर्षी राज्य शासनाकडून चार कोटी 39 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचा मावळ तालुक्यासाठी देण्यात आलेल्या 711 कोटी 23 लाखांच्या निधीत समावेश नाही, असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

मात्र, या पाणीपुरवठा योजनेसाठी कॅंटोन्मेंट प्रशासन आणि बोर्डातील सत्ताधाऱ्यांनी केंद्राकडून ‘एनओसी’ मिळविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे निधी मंजूर होऊन आठ ते नऊ महिने झाले तरी अजूनही या योजनेच्या कामाला सुरु झाली नसल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. या योजनेचे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी कॅंटोन्मेंट प्रशासन आणि माजी नगरसेवकांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे आवाहनही पाणी केले.

देहूरोड येथील रेल्वे पुलाच्या कामासाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी भाजपने सहकार्य करावे. कामामध्ये श्रेयवादाचा विषय होऊ नये.  मी माझी जबादारी पार पाडेन, अशी ग्वाही सुद्धा   आमदार शेळके यांनी दिली.

पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाटा, वडगाव फाटा, तळेगाव लिंब फाटा, सोमाटणे फाटा व देहूरोड बाह्यवळण रस्ता या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा 400 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली.

तसेच मामुर्डी -सांगावडे पुलासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच राज्य शासनाकडूनही निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. या पुलाच्या उभारणीसाठी 9 कोटी इतका खर्च अपेक्षित असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकर नगर आणि पारशी चाळ येथे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कोविड -19 उपाययोजनांसाठी 85 लाख, बंदिस्त गटर योजनेसाठी 20 लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 1  कोटी, चिंचोली येथील मारुती मंदिरासमोरील रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणासाठी 3 लाख व पाटील चाळ ते जाधव चौक रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणासाठी 3  लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली.

मावळच्या जनतेने मोठ्या विश्वासाने आमदारकीची जबाबदारी सोपविली आहे. आगामी काळात सुमारे 1500 कोटी रुपयांची विविध विकासकामे प्रस्तावित असून पुढील साडेतीन वर्षात ही सर्व कामे पूर्ण करून तालुक्याचा सर्वार्थाने कायापालट करण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.