Maval News: पार्थसाठी मावळ सोडण्याची मागणी!  शिवसेना खासदार बारणे म्हणतात…

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने काल युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फेसबुक पोस्ट करत शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांच्यासाठी सोडावा आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी केली. त्यावर ‘मागणी केली की करायला लावली’ याचा शोध लावावा लागेल, असे सांगत शिवसेना खासदार बारणे यांनी प्रत्युत्तर दिले.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा जवळपास पावणे दोन लाखांनी पराभव केला होता. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडी एकत्रित सत्तेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकील दोन वर्षे बाकी असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली जात आहे.

याबाबत मुंबईत एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”खर तर कोण, कोणी मागणी केली. मागणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोण आहेत, कोणत्या पदावर आहेत, मी त्यांना ओळखत नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीला जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे. ही मागणी केली की करायला लावली. याचा शोध लावावा लागेल. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2019 च्या निवडणुकीला मी उभा होतो. त्यावेळेस मी अगोदरच सांगितले होते. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी दीड ते दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होईल”.

मावळ लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला. तर, एक विधानसभा सोडली तर मावळ मतदरासंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद उरलेली नाही. त्यांची ताकद मर्यादित आहे. परंतु, या सगळ्याबाबतीमध्ये जाणीवपूर्वक या गोष्टी काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला डिवचतो का, काय याचा पण शोध घ्यावा लागेल. आज महाविकास आघाडी म्हणून सत्तेमध्ये आहे. परंतु, सत्तेमध्ये असताना शिवसेना पक्षाचे माझे सर्व शिवसैनिक, कार्यकर्ते असतील. त्यांना कशाप्रकारची वागणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळते. हे देखील आपण पाहिले. तर सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादीला मिळत आहे, असे बारणे म्हणाले.

शिवसेनेला डिवचण्याचे काम किंवा शिवसेनेच्या बाबतीत दुजाभाव करण्याचे काम महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होत आहे. आणि त्याचाच एक हा भाग असू शकतो. परंतु, लोकसभा निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी आहे. दोन वर्षामध्ये बरीच काही  स्थित्यंतरे होऊन जातील. आज त्याच्या बाबतीत चर्चा करणे मला तरी योग्य वाटत नाही, असा शेरा खासदार बारणे यांनी मारला.

महाविकास आघाडी म्हणायचे आणि दुस-या पक्षाविषयी आकस दाखवायचा हे बरोबर नाही,  असेही ते म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.