Maval News: मावळ तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींचा कारभार पाच प्रशासकांच्या हातात; अनेक इच्छुकांचे स्वप्न भंगले

प्रतिष्ठित व्यक्तीची नेमणूक न करता प्रशासनातील अधिका-यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्याने सरपंचपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधलेल्या अनेकांचे स्वप्न भंगले आहे.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील मुदत संपलेल्या 51 ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पाच प्रशासक 51 ग्रामपंचायतींचा कारभार पाहणार आहेत. तत्पूर्वी मुदत संपणा-या ग्रामपंचायतीमध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची सरपंच म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर गावातील अनेकांनी नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या होत्या. परंतु, प्रतिष्ठित व्यक्तीची नेमणूक न करता प्रशासनातील अधिका-यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्याने सरपंचपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधलेल्या अनेकांचे स्वप्न भंगले आहे.

कोरोनाची साथ सुरु असल्याने सर्व गोष्टी पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांच्या मोठ्या संख्येने एकत्र येण्यावर, गर्दी जमविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

त्याबाबत राज्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साथ लक्षात घेता निवडणुका घेणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने सुरुवातीला असा निर्णय घेतला होता की, ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे, त्या ग्रामपंचायतींवर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची नेमणूक करण्यात येईल. त्याद्वारे गावाचा कारभार चालवला जाईल. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर निवडणुका घेऊन पुन्हा नवीन निवड करण्यात येईल.

शासनाचा आदेश येताच मुदत संपणा-या गावातील तथाकथित प्रतिष्ठित व्यक्तींनी आपापल्या नेत्यांकडे धाव घेतली. काहीही झाले तरी गावचा कारभारी आपल्यालाच करावे, अशा विनंत्या, आर्जव नेत्यांकडे होऊ लागले. अनेकांना सरपंचपदाचे वेध लागले. गुडघ्याला बाशिंग बांधून अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली.

गावातील व्यक्तीची नेमणूक करताना कोणते निकष लक्षात घ्यावेत, तसेच निवडीच्या अन्य बाबी समाधानकारक न वाटल्याने न्यायालयाने याबाबत आपला निर्णय दिला. त्यानुसार, मुदत संपणा-या ग्रामपंचायतींवर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची नेमणूक न करता प्रशासनातील अधिका-यांची प्रशासक म्हणून नेमणूक करावी, असा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंच पदासाठी तयार झालेल्या अनेकांचा स्वप्नभंग झाला.

मावळ तालुक्यातील 51 ग्रामपंचायातींवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पंचायत विस्तार अधिकारी बी बी दरावडे (12 ग्रामपंचायती), एम टी कारंडे (13 ग्रामपंचायती), शिक्षण विस्तार अधिकारी एस आर वाळुंज (9 ग्रामपंचायती), कृषी विस्तार अधिकारी एस बी मेंगडे (9 ग्रामपंचायती), एस जी म्हसे (8 ग्रामपंचायती) या पाच विस्तार अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे विस्तार अधिकारी या ग्रामपंचायतींचे कार्यकारी कारभारी असणार आहेत.

मावळ तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायती –
नवलाख उंबरे, खडकाळा, कुसगाव बुद्रुक, टाकवे बुद्रुक, वेहरगाव, ताजे, साई, मळवली, कार्ला, कुरवंडे, पाटण, आपटी, सोमाटणे, साते, गहुंजे, उर्से, आंबी, उकसान, शिरदे, शिवणे, थुगाव, धामणे, परंदवडी, डाहुली, वडेश्वर, माळेगाव, खांड, घोणशेत, आडे, कोथुर्णे, येळसे, कशाळ, नाणे, तिकोना, कुसगाव पमा, पाचाणे, वारू, अजिवली, मोरवे, कुसगाव खुर्द, खांडवी, आढले खुर्द, येलघोल, शिवली, बऊर, चिखलसे, करंजगाव, दारूंब्रे, सांगवडे, महागाव, मळवंडी ठुले

पाच प्रशासकांकडे 51 ग्रामपंचायतींचा कारभार दिल्याने कारभार कसा चालणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वास्तविक पाहता एका ग्रामपंचायतचा कारभार पाहण्यासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्यासह सात ते सतरा सदस्यांची संख्या असते. आता मात्र एकच प्रशासक ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणार असून एका प्रशासकाकडे आठ, नऊ, बारा व तेरा अशा संख्येने ग्रामपंचायतीची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

याशिवाय त्यांच्याकडे त्यांच्या विभागाचा स्वतंत्र कारभार, भरीस भर म्हणजे कोविड व्यवस्थापनाच्या कामाची मोठी जबाबदारी असे अत्यंत व्यस्त कामकाज असल्याने ग्रामपंचायतींना हे प्रशासक कसा वेळ देणार? आणि ग्रामपंचायतींचा कारभार कसा चालवणार? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे याचा परिणाम गावाच्या विकास, नियंत्रण व नियोजनावर होणार असल्याची तालुक्यात मोठी खंत व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.